22.9 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeमनोरंजनकलाकारांना अटेन्शनची भूक : गश्मीर

कलाकारांना अटेन्शनची भूक : गश्मीर

मुंबई : अभिनेता गश्मीर महाजनी याने स्वत:ला फक्त मराठी इंडस्ट्रीपर्यंत मर्यादित न ठेवता बॉलिवूडमध्ये देखील अनेक प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. सर्वांत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणून गश्मीर याला चाहत्यांकडून प्रेम मिळते. नुकतीच त्याची ‘गुनाह’ ही क्राईम थ्रिलर सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजच्या प्रमोशनसाठी तो विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गश्मीर महाजनीने कलाकारांची पोलखोल केली.

गश्मीर महाजनीने नुकतेच ‘द फ्री प्रेस जर्नल’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने प्रायव्हसीवरून जे कलाकार राग आळवतात, त्यांच्या ढोंगीपणावर टीका केली. गश्मीर म्हणाला, ‘लोकांच्या नजरेत राहणं हे कोणतेही आव्हान नाही. जर तुम्हाला अभिनेता व्हायचे असेल तर तुम्हाला लोकांच्या नजरेत राहावे लागेल. जर तुम्हाला ते आव्हानात्मक वाटत असेल तर मी म्हणेन, तुम्ही अभिनेता बनू नका. लोकांनी तुमच्याजवळ यावे आणि तुमच्यासोबत सेल्फी काढावेत अशी तुमची इच्छा असते आणि मग तुम्ही ‘अरे, हे खूप अवघड आहे, माझ्या आयुष्यात काय सुरू आहे, याकडे लोकांचे लक्ष असते असे म्हणत त्याला ग्लॅमराईज करण्याचा प्रयत्न करता. जर तुम्हाला हे नकोय, तर मग अभिनेता का झालात? अभिनेता होण्यापूर्वी तुम्हाला हे माहीत होते की असे घडणार आहे आणि तुम्हाला ते हवे होते. प्रत्येक अभिनेत्याला हे हवे असते.

गश्मीर म्हणाला, ‘कलाकार हे अटेन्शनचे भुकेले असतात. त्यांना अटेन्शन पाहिजे असतं, हे नाकारणारे लोक खोटे आहेत. आता सोशल मीडियावर लोकांनी आपले खोटे चेहरे दाखवायला सुरुवात केली आहे, प्रत्येकजण खोटे बोलतोय. अरे माझे खासगी आयुष्य’ असे ते फक्त बोलतात. पण माझ्यासह प्रत्येक अभिनेत्याला लोकांचे अटेन्शन हवे असते. ज्या दिवशी लोक तुम्हाला पाहणं बंद करतील, तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत त्यादिवशी तुम्ही उद्ध्वस्त व्हाल आणि कोणत्याही अभिनेत्याला हे व्हावे असे वाटत नाही.

गश्मीर पुढे म्हणाला, तुमच्याकडे जी अत्यंत खासगी गोष्ट आहे, ती तुम्ही लोकांना दाखवू नका. तुमच्या घरात काय आहे, तुमच्या बेडरूममध्ये काय आहे, हे सर्व खाजगी आहे. जोपर्यंत तुम्ही ते व्हीडीओ शूट करून इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये टाकत नाही तोपर्यंत कोणीही ते पाहू शकणार नाही. तुम्ही स्वत:च ते दाखवता आणि मग म्हणता माझे वैयक्तिक आयुष्य खासगी राहू द्या.’

गश्मीर सध्या घरापासून दूर रोमानियामध्ये ‘खतरों के खिलाडी सीझन १४’ साठी शूटिंग करत आहे. गश्मीरला ‘खतरों के खिलाडी’ मध्ये स्टंट करताना पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. गश्मीरने आतापर्यंत ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘देऊळ बंद’, ‘विशू’, ‘डोंगरी का राजा’ अशा सिनेमांमध्ये काम केले आहे. शिवाय तो हिंदी मालिकांमध्ये झळकला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR