27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरमाजलगावात आडसकर राष्ट्रवादीला ‘हाबाडा’ देणार?

माजलगावात आडसकर राष्ट्रवादीला ‘हाबाडा’ देणार?

माजलगाव : प्रतिनिधी
भाजपचे नेते रमेश आडसकर यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यांना माजलगावातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता; परंतु ऐनवेळी मोहन जगताप यांना उमेदवारी जाहीर करून शरद पवारांनी आडसकरांना ‘हाबाडा’ दिला. आता आडसकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केला असून विधानसभेच्या मैदानात असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीस ‘हाबाडा’ देण्याची तयारी केली आहे.

भाजपकडून २०१९ची विधानसभा लढताना मतदारसंघात जास्त संपर्क नसतानाही रमेश आडसकर यांनी चांगले मताधिक्य मिळवले होते. त्यानंतर मागील पाच वर्षात आडसकर यांनी मतदारसंघात सर्वत्र भेटीगाठी देत जनसंपर्क वाढवला. मात्र, राष्ट्रवादी महायुतीमध्ये आल्याने माजलगाव मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला. भाजपत राहून उमेदवारी मिळणार नसल्याने तुतारीची साथ घेतली. दोन दिवसांपूर्वी माजलगाव मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असा शब्द मिळाल्याने त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

मात्र, भाजपमध्येच असलेले आणि पक्ष प्रवेशही न झालेले मोहन जगताप यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली. यामुळे आडसकरांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. आज मोठे शक्ती प्रदर्शन करत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.

माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील आणि मोहनराव सोळंके या दोघांनी रमेश आडसकरांना पाठिंबा दिला. यंदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश सोळंके आणि ज्यांच्यामुळे शरद पवार गटाची उमेदवारी मिळाली नाही ते मोहन जगताप या दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना शक्तिप्रदर्शनातून आडसकर यांनी इशाराच दिल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

मोहन जगताप किंवा माझ्या पत्नीला उमेदवारी द्या, असे म्हणत अडून बसलेले खासदार बजरंग सोनवणे यांनी या दोघांपैकी एकास उमेदवारी न दिल्यास खासदारकीचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेतल्याने शरद पवार यांनी मोहन जगताप यांचे नाव रविवारी पहाटे फिक्स केल्याचे सांगण्यात येते. माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, नारायणराव डक, मनोहर डाके यांच्यासह अनेकांनी शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु बजरंग सोनवणे यांनी यापैकी कोणाचीच शिफारस केली नसल्याचे देखील बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR