महाबळेश्वर : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याच्या महाबळेश्वर येथील हॉटेलवर प्रशासनाचा बुलडोझर चालला आहे. पारसी जिमखान्याच्या जागेवर बेकायदेशीरपणे बांधलेल्या हॉटेलवर स्थानिक प्रशासनाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रत्यक्षात आठवडाभरापूर्वी प्रशासनाने अवैध हॉटेल सील केले होते, त्यानंतर आता त्यावर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी सकाळी एका अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्शे कारने दुचाकीवरून प्रवास करणा-या दोन आयटी इंजीनिअर्सना धडक दिली होती, ज्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. याआधी पुणे पोलिसांनी या प्रकरणी अनेक एफआयआर नोंदवले आहेत. त्यामध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे. शहरातील एका व्यावसायिकाच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीचे वडील, आजोबा व अन्य तिघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पुण्यातील वडगाव शेरी परिसरात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कातुरे यांनी विनय काळे नावाच्या व्यक्तीविरोधात फिर्याद दिली होती. डी. एस. कातुरे यांचा मुलगा शशिकांत कातुरे याने विनय काळे यांच्याकडून बांधकामासाठी कर्ज घेतले होते. कातुरे हे कर्ज वेळेवर फेडू शकले नाहीत, तेव्हा काळे याने मूळ रकमेवर चक्रवाढ व्याज आकारण्याची धमकी देऊन त्रास देण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांनी सांगितले.