22.1 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरजालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९८ जागांवर प्रवेश निश्चित

जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९८ जागांवर प्रवेश निश्चित

जालना : जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळाली असून १० नोव्हेंबर २०२४ पासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. यासाठी वेळेत कामे पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. मात्र, पुढील १० दिवसांत विद्यार्थ्यांसाठी लागणा-या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे अधिष्ठाता यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. महाविद्यालयात ९८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण घेण्यासाठी १०० जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत ९८ जागांवर प्रवेश निश्चित झालेले आहेत. यात परराज्यातील १५ विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे केवळ दोन जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले. घाईगडबडीत मंजुरी मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारी जागा मिळविणे हे प्रशासनासमोर सर्वांत मोठे आव्हान होते. वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रशस्त इमारत मिळालेली आहे असे असले तरी त्या इमारतीमध्ये वेळेत शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध होणे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे असणार आहे.

शैक्षणिक सत्राला सुरुवात होण्यापूर्वी प्रशासनाकडून तयारी केली जात असली तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना बसण्याकरिता लागणारे बाकडे, डिजिटल बोर्ड, कँटीन सुविधा, डिजिटल ग्रंथालय यासह इतर शैक्षणिक सुविधा वेळेवर मिळणार का? हे पुढील दहा दिवसांतच कळणार आहे.

१० नोव्हेंबरपासून सत्राला सुरुवात
शंभर पैकी ९८ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ७ नोव्हेंबरला वेलकम पार्टीचे आयोजन करण्यात आले असून, १० नोव्हेंबरपासून नवीन शैक्षणिक सत्राला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना लागणा-या सर्व शैक्षणिक सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये डिजिटल बोर्ड आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकड्यांचे काम पूर्ण होणार असल्याचे अधिका-याने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR