सोलापूर : शासनाकडून शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ४६८ पदांची जाहिरात अपलोड केली आहे. आणखी काही जागांची माहिती अपलोड होणार असून, फेब्रुवारीअखेर शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्यातील २६ जिल्हा परिषदा, काही नगरपालिका, महापालिकेच्या रिक्त जागासंदर्भात बिंदुनामावली पूर्ण करून शिक्षक भरतीची जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यानुसार आता सोलापूर जिल्हा परिषदेला मराठी, इंग्रजी, कन्नड व उर्दू माध्यमाचे एकूण
४६८ शिक्षक मिळणार आहेत. जिल्ह्यातील काही अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्यानंतर उर्वरित खासगी शाळांची रोस्टर तपासणी, बिंदुनामावली पूर्ण झाल्यानंतर सुमारे १२० जागा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास ७०० जागांची मेगा भरती जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा आहेत. साधारणतः सात वर्षांपासून शाळांमधील संपूर्ण रिक्त पदांची भरती न झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक कमीच होते. आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ऐतिहासिक शिक्षक भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषदेने मराठी, उर्दू व कन्नड माध्यमांच्या शाळांमधील रिक्त पदांची बींदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्याभरात १७९ केंद्रशाळा आहेत. त्याअंतर्गत आता प्रत्येक केंद्र शाळेसाठी स्वतंत्र इंग्रजी शिक्षक घ्यावा लागणार आहे. जिल्हा परिषदेकडे सध्या इंग्रजीचे ६९ शिक्षक आहेत. त्यामुळे इंग्रजी विषयासाठी अजून ९१ शिक्षक मिळावेत, अशी मागणी पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या जाहिरातीतून केली आहे. त्यामुळे मराठी माध्यमांचे ३१२ शिक्षक भरले जातील, शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून त्यात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप असणार नाही. ‘कन्नड’ची विदुनामावली अल्पावधीत पूर्ण करून काही दिवसांत त्याची मान्यता मिळविली. शेवटच्या दिवशी जाहिरात ‘पवित्र’वर अपलोड करण्यात आली आहे.