23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयदहशतवाद्यांवर हेलिकॉप्टर-ड्रोनद्वारे आकाशातून पाळत

दहशतवाद्यांवर हेलिकॉप्टर-ड्रोनद्वारे आकाशातून पाळत

राजौरी जंगलात शोधासाठी मोठे ऑपरेशन पोलिसांची संयुक्त मोहीम सुरू

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात घात लावून बसलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन लष्करी वाहनांवर गुरुवारी हल्ला केला. त्यात ५ जवान शहीद झाले असून २ जखमी झाले. ढेरा की गली आणि बुफलियाज दरम्यानच्या घनदाट जंगलात जेथे याआधीही अनेक जवानांना जीव गमवावा लागला, तेथेच पुन्हा हल्ला झाला.

सदर हल्ल्यानंतर ढेरा की गली घनदाट जंगलात कालपासून भारतीय लष्कराचे जवान शोध मोहीम राबवत आहे. भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफने या भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संयुक्त मोहीम सुरू केली आहे. घनदाट जंगलात जमिनीवर शोध घेण्याबरोबरच हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या माध्यमातून आकाशातून पाळत ठेवली जात आहे. घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांतून दहशतवादी हल्ल्याची भीषणता पुढे आली. दहशतवाद्यांसोबत जवानांची झटापटही झाली असण्याची शक्यता आहे. रस्त्यावर रक्त, सैनिकांचे तुटलेले हेल्मेट आणि वाहनांच्या फुटलेल्या काचा दिसतात. लक्ष्य केलेल्या जवानांची शस्त्रे घेऊन दहशतवादी पळाल्याची शक्यता अधिका-यांनी वर्तवली आहे.

जवानांसाठी घनदाट जंगल घातक
राजौरी आणि पूँछ जिल्ह्यांच्या सीमेवरील ढेरा की गली आणि बुफलियाज दरम्यानचा भाग घनदाट जंगलाचा आहे. तेथून पुढे चमरेर आणि भाटा धुरियन जंगल लागते. याच भागात या वर्षी २० एप्रिलला लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. मे महिन्यात, चमरेर जंगलात ५ जवान शहीद झाले आणि एक प्रमुख अधिकारी जखमी झाला. एक विदेशी दहशतवादीही मारला गेला. ऑक्टोबर २०२१ मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या दोन हल्ल्यांमध्ये नऊ जवान शहीद झाले होते. ११ ऑक्टोबरला चमरेर येथे एका कनिष्ठ अधिका-यासह(जेसीओ) पाच जवान शहीद झाले, तर १४ ऑक्टोबरला जवळच्या जंगलात एक जेसीओ आणि तीन जवान मारले गेले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR