नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्राच्या महत्त्वाकांक्षी चित्ता पुनर्वसन प्रकल्पांतर्गत दक्षिण आफ्रिका व नामिबियातून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेल्या चित्त्यांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. या उद्यानातील बिबट्यांची अधिक संख्या व पुरेशी शिकार उपलब्ध न होण्याच्या आव्हानांचा त्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे, कुनोनंतर मध्य प्रदेशातीलच गांधीसागर वन्यजीव अभयारण्यातील चित्त्यांचे स्थलांतर लांबले आहे. हे अभयारण्य चित्त्यांचे दुसरे वसतिस्थान असेल.
चित्ता प्रकल्पाच्या सुकाणू समितीच्या बैठकीतील नोंदीवरून ही बाब उघड झाली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये भारतात आणलेल्या या चित्त्यांसाठी शिकारीत वाढ करणे व बिबट्यांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्याची गरज त्यातून अधोरेखित झाली आहे. तीन चित्त्यांचा मृत्यू झाल्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चित्त्यांना पुन्हा खुल्या जंगलातून बंदिस्त अधिवासात आणले होते. मात्र, शिकारीसाठी कमी सावज उपलब्ध असणे, हेही त्यांचा बंदिस्त अधिवासातील मुक्काम वाढण्याचे कारण आहे.
अंतरिम तोडगा म्हणून कुनो व गांधीसागर या दोन्ही उद्यानांत शिकारीचे प्रमाण वाढविले जात आहे. मात्र, स्थलांतर करून कायमस्वरूपी शिकारीचे प्रमाण वाढविता येत नाही, याची काळजीही भेडसावत आहे. दोन्ही उद्यानांतील बिबट्यांची वाढती संख्या ही आणखी एक डोकेदुखी असून बिबट्यांच्या स्थलांतरासाठीही तातडीने पावले उचलली जात आहेत.
जूनमध्ये झालेल्या बैठकीत मंदसौरचे विभागीय वनाधिकारी संजय रायखेरे यांनी सांगितले होते, की गांधीसागर अभयारण्यातील ६४ चौ. कि.मी.च्या बंदिस्त अधिवासात २४ बिबटे असून चित्त्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यातील १५ बिबट्यांना तेथून हलविण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली होती.