22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीय२१ वर्षांनंतर उघडले श्रीराम मंदिराचे दरवाजे

२१ वर्षांनंतर उघडले श्रीराम मंदिराचे दरवाजे

सुकमा : श्रीराम जन्मभूमी अयोध्येत भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिर उभारणीसाठी रामभक्तांना ५०० वर्षे वाट पाहावी लागली. त्याचप्रमाणे नक्षलवादाचा फटका बसलेल्या सुकमा जिल्ह्यातील ग्रामस्थदेखील २१ वर्षांपासून तेथील श्रीराम मंदिराचे दरवाजे उघडण्याची वाट पाहत होते. नक्षलवाद्यांच्या आदेशामुळे २००३ साली मंदिर बंद करण्यात आले होते. पण, आता दोन दशकानंतर केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ७४ व्या कोरचा कॅम्प उभारल्यानंतर सैनिकांनी मंदिरात पूजा सुरू केली आहे.

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील लखापाल आणि केरळपेंडा या नक्षलग्रस्त गावांची ही घटना आहे. गावात सुमारे पाच दशकांपूर्वी श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींचा अभिषेक सोहळा झाला. पण नंतर नक्षलवादाच्या वाढत्या उद्रेकामुळे २००३ मध्ये राम मंदिराची पूजा बंद करण्यात आली. नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे दोन दशकांपासून या मंदिराचे दरवाजे उघडण्याची कुणाचीही हिम्मत झाली नाही.

कधी बांधले मंदिर?
१९७० मध्ये बिहारी महाराजांनी मंदिराची स्थापना केली होती. त्याकाळी मालाची ने-आण करण्यासाठी ना रस्ते होते, ना वाहने उपलब्ध होती. म्हणूनच संपूर्ण गावाने सुमारे ८० किलोमीटरवरुन पायी स्वत:च्या डोक्यावर सिमेंट, दगड, खडी आणि इतर सामान आणले होते. मंदिराच्या स्थापनेत गावातील सर्व लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मंदिराच्या स्थापनेनंतर संपूर्ण परिसर श्रीरामाचे भक्त बनले. ग्रामस्थांनी सांगितले की, प्राचीन काळी येथे खूप मोठी जत्रा भरत असे, अयोध्येतून साधू-संतही यायचे. मात्र नक्षलवादी वाढल्याने आणि पूजाअर्चा बंद झाल्याने सर्व गोष्टी पूर्णपणे ठप्प झाल्या. नक्षलवाद्यांच्या दबावामुळे पूजा थांबल्यावर जत्राही थांबली. नंतर नक्षलवाद्यांनी या मंदिराची विटंबना करून कुलूप लावले. गावातील पुजारी मंदिराची पूजा आणि देखभाल करत असत. मात्र नक्षलवाद्यांच्या आदेशानंतर पुजारी निघून गेले. नंतर मंदिर परिसरात गवत व झाडे वाढून मंदिराची अवस्था दयनीय झाली.

सीआरपीएफ सैनिकांनी दरवाजे उघडले
अखेर दोन दशकानंतर सीआरपीएफ जवानांनी नक्षलवाद्यांच्या आदेशानंतर बंद केलेले मंदिराचे दरवाजे उघडले. दरवाजे उघडल्यानंतर ग्रामस्थांसह अधिकारी व जवानांनी मंदिराची स्वच्छता आणि विधीवत पूजाही करण्यात आली. यावेळी गावातील बहुसंख्य स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. या मंदिरात विधीवत पूजा केल्याने ग्रामस्थ खुप खुश आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR