बीड : प्रतिनिधी
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लागल्यानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. काल परळीत वाल्मिक कराडविरोधातील कारवाईनंतर पडसाद उमटले होते. आज दुस-या दिवशीही परळीत तणावपूर्ण शांतता आहे.
या अशांततेचे लोण आता केजमध्येही पसरले आहे. वाल्मिक कराड याला बुधवारी पुन्हा केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर केज न्यायालयाबाहेर प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पोलिसांनी वकिलांनाही कोर्टात जाण्यास मनाई केली. त्यामुळे वकील प्रचंड संतापले.
पोलिसांनी गेटवर अडवल्यानंतर केज कोर्टातील वकील प्रचंड संतापले. कोर्टात जाताना तपासणी होत असल्याबद्दल वकिलांनी आक्षेप घेतला. आम्ही काहीही केले नाही. मग आमची तपासणी आणि आम्हाला का अडवले जाते. कोणत्याही वकिलाला थांबवायचे नाही. अन्यथा वातावरण वेगळे होईल, असा इशारा एका वकिलाने पोलिसांना दिला.
पोलिस आणि वकिलांच्या या बाचाबाचीमुळे केज न्यायालयाच्या आवारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि वकिलांच्या मध्यस्थीने हा वाद थांबला. मात्र, अद्यापही पोलिसांकडून केज न्यायालयात येणा-या लोकांची तपासणी आणि चौकशी सुरूच आहे.
बीडच्या पांगरी गावात तरुण टॉवरवर चढले
वाल्मिक कराड याच्यावरील कारवाईनंतर वाल्मिक कराडच्या मूळगावी पांगरीत पाच तरुण टॉवरवर चढले आहेत. हे तरुण मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत. वाल्मिक कराडवर राजकीय आणि जातीय द्वेषातून कारवाई झाली असल्याचा आरोप हे नागरिक करत आहेत. पांगरी गावातील पुरुष-महिला एकत्रित येऊन वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ निदर्शने करत आहेत.