मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ सादर केला. त्या अर्थसंकल्पीय भाषण करत असतानाच लोकांनी सोशल मीडियावर अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावरही मोठ्या संख्येने लोकांनी मीम्स शेअर केले आहेत.
लोक स्वत:साठी करदाते या नात्याने काही महत्त्वांच्या घोषणा होतात का याची वाट पाहत होते. या वेळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #बजेट२०२४ मोठ्या प्रमाणावर हॅशटॅग ट्रेंड करत होता. या दरम्यान मीम्स देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहेत. २०२४ चा अर्थसंकल्प अशा वेळी आला आहे, जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था जागतिक आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. आता भारताचे ध्येय आत्मनिर्भर अर्थव्यवस्था आहे. अर्थसंकल्पाचा हा काळही महत्त्वाचा आहे. कारण, याच वर्षी लोकसभा निवडणुकाही होणार आहेत. अशा स्थितीत सरकारच्या दुस-या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता. सरकारकडून जनतेच्या अनेक अपेक्षा होत्या. या अर्थसंकल्पात करदात्यांना कोणतीही नवीन सूट देण्यात आलेली नाही. यावरती देखील मीम्स मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत.
आयकरात बदल नसल्याने नाराजी
जेव्हा लोकांना आयकरात कोणताही बदल न झाल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांची निराशा होऊ लागली. जी अनेकांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर करून व्यक्त केली आहे. याचा अर्थ आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. स्टार्टअपसाठी कर सवलत एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.
लक्षव्दीपच्या पर्यटनाला चालना
कोणतीही नवीन कर सूट न मिळाल्याने लोक नाराज असताना, लक्षद्वीपच्या घोषणेने ते आनंदी दिसले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी, लक्षद्वीपसह आमच्या बेटांवर कनेक्टिव्हिटी, पर्यटन पायाभूत सुविधा आणि सुविधांसाठी प्रकल्प सुरू केले जातील. याबद्दल लोकांनी आनंद व्यक्त केला. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली तेव्हा मालदीवचे नेते भारताविरोधात बोलू लागले. या कारणास्तव लोकांनी मालदीववर बहिष्कार टाकून लक्षद्वीपला जाण्याचा सल्ला दिला.