22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रचिकलठाण्यात पोलिसांच्या मध्यस्थीनंतर धार्मिक तणाव निवळला

चिकलठाण्यात पोलिसांच्या मध्यस्थीनंतर धार्मिक तणाव निवळला

दगडफेकीनंतर कडक बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथे मंगळवारी रात्री एका टोळक्याने मंदिरात जाऊन आरती बंद करण्याचे सांगितल्यानंतर झालेल्या वादानंतर एका तरुणाला मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच दोन भिन्न धर्मीय समाजांचे दोन गट आमने-सामने रस्त्यावर आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

एकाबाजूने दगडफेकीचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.
चिकलठाणा येथील दोन भिन्न धर्मांची प्रार्थनास्थळे जवळजवळ आहेत. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास महिला मंदिरात आरती करत असताना दुस-या समुदायाचे काही तरुण आले आणि त्यांनी त्यांच्याशी वाद घातला.

यावेळी राजू रोटे, कृष्णा नागे यांना मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले तसेच गुप्ता नावाच्या महिलेलाही यावेळी समुदायातील लोकांनी धक्काबुक्की केल्याने ती जखमी झाल्याचे कळते. परिसरातील दोन्ही समुदायांचे जमाव रस्त्यावर समोरासमोर आले. दोन्ही गट परस्परविरोधी घोषणा देत होते. तणाव निर्माण झाल्याचे पाहून व्यापा-यांनी दुकाने बंद केली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नवनीत काँवत, उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात, पोलिस निरीक्षक गौतम पातारे, संदीप गुरमे, राजेश यादव यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, एसआरपीचे जवान आणि अन्य पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी सर्वप्रथम जमावावर सौम्य लाठीमार केला. जखमी तरुणाला एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात नेऊन त्याची तक्रार नोंदवून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दीड वर्षापासून धुसफूस
चिकलठाणा येथील दोन्ही धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांवरून उभय समुदायांतील तरुणांमध्ये धुसफूस सुरू आहे. दीड वर्षापूर्वी यावरून भांडण झाले होते. मात्र, गावातील ज्येष्ठ मंडळींनी सामंजस्याची भूमिका घेतली होती. आता रमजान महिन्याच्या पहिल्याच रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR