22.6 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeराष्ट्रीयधमकीमुळे विमान कंपन्यांना मोठा आर्थिक भुर्दंड

धमकीमुळे विमान कंपन्यांना मोठा आर्थिक भुर्दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या १४ ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी मुंबईहून न्यूयॉर्कला जाण्यासाठी एअर इंडियाच्या एका विमानाने उड्डाण केले. बोइंग ७७७ विमानाने १३० टन जेट फ्यूअलसह १६ तासाच्या नॉन स्टॉप प्रवासासाठी मुंबईतून टेक ऑफ केले. मात्र, काही मिनिटात एअर इंडियाला फोन आला. ज्यात विमानात बॉम्ब असल्याचे म्हटले. त्यावेळी एअर इंडियाच्या ११९ या विमानाला तातडीने डायवर्ट करण्यात आले. उड्डाणानंतर दोन तासांत विमानाला दिल्ली विमानतळावर उतरण्याची तयारी करण्यात आली. विमानाचे २ तासांत जवळपास १०० टन इंधन जळते, याचा विचार केल्यास केवळ इंधनाचा खर्च १ कोटीवर पाण्यात जातो. यासोबतच इतर खर्चाचाही मोठा भुर्दंड कंपनीला सहन करावा लागतो. अतिरिक्त खर्चाची सरासरी ६० ते ८० कोटींवर जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

विमान कंपन्यांना धमक्याचे सत्र सुरूच असून, शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी इंडिगोच्या ५ विमानांना बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. आकासा एअरलाइन्सच्या पाच विमानांना ही धमकी देण्यात आली. दरम्यान, गेल्या ६ दिवसांत म्हणजे १४ ऑक्टोबरपासून ७० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. याचा फार मोठा भुर्दंड या कंपन्यांना सोसावा लागला आहे. त्यामुळे हे धमकीचे सत्र खूप महागात पडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
खरे तर न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावर जाण्यासाठी निघालेले विमान २ तासात दिल्ली विमानतळावर उतरवायचे म्हटले तर १०० टन इंधन वाया जाते. या इंधनाची किंमत एक लाख रुपये प्रतिटन आहे.

म्हणजेच एका धमकीने नुसता इंधनाचा विचार केला तर १ कोटी रुपये वाया जातात. बोईंग विमानाचे लँडिंग वजन २५० टन असते. यात प्रवासी, सामान, कार्गोसह हे वजन ३४० ते ३५० टन इतके होते. दिल्ली विमानतळावर विमान उतरवण्यासाठी लँडिंग आणि पार्किंग शुल्क आणि अन्य खर्च, दिल्लीमधील हॉटेलमध्ये २०० हून अधिक प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना थांबवणे आणि त्यानंतर नुकसान भरपाई आदी खर्च येतो. त्यामुळे एका धमकीमुळे विमान कंपनीचे खूप मोठे नुकसान होते.

बॉम्बच्या धमकीनंतर इमरजन्सी लँडिंगनंतर संपूर्ण तपासणी आणि विमान पुन्हा सेवेत आणण्यासाठी ऑपरेटिंग क्रूची नवी व्यवस्था करावी लागते. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेटिंग क्रू विमान न्यूयॉर्क विमानतळापर्यंत पोहोचेपर्यंत प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. एका बनावट कॉलमुळे विमान कंपनीला ३ कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान होते. गेल्या रविवारपासून भारतातील अनेक विमान कंपन्यांना धमकीचे बनावट फोन आले आहेत. यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. विमान कंपन्यांच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त खर्च ६० ते ८० कोटी इतका होतो.

दिवसाला १७ हजार डॉलर जातात पाण्यात
बी ७७७ चे महिन्याचे भाडे ४००,००० डॉलर ते ६००,००० डॉलर दरम्यान असते. त्यामुळे दिवसाला साधारण १७ हजार डॉलर पडतात. विमानाचे एक दिवस उड्डाण रद्द करणे म्हणजे १७ हजार डॉलरचे नुकसान होते. जर बॉम्बची धमकी दिली गेली नाही तर विमान शिकागोला पोहोचून काही तासात पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले असते. मात्र, धमकीमुळे त्याचा फार मोठा भुर्दंड विमान कंपनीला बसतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR