अहमदनगर : प्रतिनिधी
नगर येथील कीर्तनकार अजय महाराज बारस्कर यांची कार पंढरपूर येथे जळाली आहे. ही कार कोणीतरी पेटवली असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे. बारस्कर हे आषाढी एकादशीनिमित्त १६ तारखेला पंढरपूर येथे गेले होते. पंढरपूर येथे ६५ एकरच्या पार्किंगमध्ये आपले वाहन लावून ते चंद्रभागेतील स्नानासाठी गेले.
त्यानंतर त्यांना गर्दीमुळे पार्किंगमध्ये पोहोचता आले नाही. १७ तारखेला दुपारनंतर ते आपल्या वाहनाजवळ पोहोचले असता त्यांना वाहन जाळलेले दिसले.
याबाबत त्यांनी पंढरपूर पोलिस स्टेशनला खबर दिली आहे. बारस्कर यांनी काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका केली होती. त्यानंतर आपणाला सतत धमक्या येत आहेत, असे बारस्कर यांचे म्हणणे आहे. ही कार पेटवण्यात आल्याचा त्यांचा संशय असून, याबाबत ते पोलिसांना आज अधिकचा तपशील देणार आहेत.