22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरअजित फाऊंडेशनने उभारली महिलांसाठी 'गोट आधार बँक'

अजित फाऊंडेशनने उभारली महिलांसाठी ‘गोट आधार बँक’

बार्शी : आतापर्यंत आपण ब्लड बँक, वॉटर बँक, मिल्क बँक, बुक बँक, पैशांच्या बँक अनेक बँका पाहिल्या असतील मात्र अजित फाऊंडेशनच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील महिलांसाठी ‘गोट आधार बँके’ची स्थापन केली आहे. शेळीला गरिबांची गाय म्हणले जाते, कुटुंबांची आर्थिक स्थिती बदलण्यासाठी शेतकरी, शेतमजूर व स्थलांतरित कुटुंबाना या गोट आधार बँकमुळे लाभ मिळणार आहे. पैसे सुरक्षित रहावे, त्यांची बचत व्हावी म्हणून जशी बँक असते, त्याच धर्तीवर पशुधनाची वाढ व्हावी, यासाठी ‘गोट आधार बँक’ तयार करण्यात आली आहे. या अभिनव गोट बँकेचे लोकार्पण गुरुवारी कोरफळे येथील गणेश ठाकरे या शेतकरी कुटुंबाना ७० हजार किमतीच्या शेळ्या देऊन महेश निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

गोट आधार बँकचे उद्धाटन सरपंच सविता शिंदे, राजेश स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई येथील शहा दाम्पत्यांनी या उपक्रमासाठी आर्थिक मदत दिली आहे. यावेळी गवळी गुरुजी, तनिष्का गटप्रमुख अंबिका ठाकरे, अर्चना ठाकरे, अर्चना ठाकरे, दिपाली ठाकरे, शोभा तिकटे, मैना संसारे, भामाबाई बरडे, कानुबाई भोगे, बाई सोनार, शकूबाई जगताप, बिंटाबाई ठाकरे, सारिका ठाकरे, भालके मामी, अंगद गवळी गुरुजी, नवनाथ जाधव, गजेंद्र ठाकरे उपस्थित होते.

ज्या भागातील शेतकऱ्यांकडे पशुधन आहे, तिथे आत्महत्येचे प्रमाण फार कमी आहे. पशुधन हे लक्ष्मीधन आहे. तो समृद्धीचा मार्ग आहे. म्हणूनच गोट आधार बँकेच्या माध्यमातून बेताची परिस्थिती असलेल्या कुटुंबात समृद्धी यावी; अजित फाऊंडेशन प्रयत्न करत आहे. ‘इच्छा तेथे मार्ग’ या तत्वानुसार संस्थेने ही संकल्पना प्रत्यक्ष राबवली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपक्रमाची माहिती गणेश ठाकरे यांनी दिली.

ग्रामीण अर्थव्यवस्था जोवर बळकट होत नाही. कृषीला जोवर पशुपालनाचा जोडधंदा मिळत नाही तोवर देश सक्षमपणे उभा होऊ शकत नाही. ग्रामीण भागास आत्मनिर्भर बनविणारा हा प्रायोगिक उपक्रम संस्थेने सुरू केला असून तो यशस्वीपणे राबवण्याची जबाबदारी सर्वानी स्वीकारायला हवी.असे अजित फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांनी सांगीतले.
‘मला मिळालेल्या शेळ्या माझ्यासाठी लक्ष्मी आहे. मी त्यांची खूप काळजी घेईन, कुटुंबातील व्यक्तीसारख जपून ईतर महिलांना यासाठी प्रेरित करेन. अजित फाऊंडेशनची मी आभारी आहे.असे गोट आधार बँक लाभार्थी दिपाली ठाकरे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR