नाशिक : शिरुरच्या सांगता सभेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमातून गैरहजर आहेत. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्याण, दिंडोरी सभेसह रोड शोमध्येही अजित पवार गैरहजर असल्याने विविध चर्चा सुरू आहेत. त्यात अजित पवारांची तब्येत खरच ठीक नाही असे विधान शरद पवारांनी केले आहे.
नाशिक दौ-यावर असलेल्या शरद पवारांना पत्रकारांनी अजित पवारांच्या गैरहजेरीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, माझ्या मते ते आजारी आहेत, त्यांची खरच तब्येत ठीक नाही असे पवारांनी अजितदादांच्या तब्येतीवर भाष्य केले. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार प्रचारात कुठेही दिसत नसल्याने त्यांची अनुपस्थिती प्रखरतेने दिसून येत आहे.
अजित पवार शिरूरच्या ११ मे च्या सभेत अखेरचे दिसले होते. मात्र त्यानंतर अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. १३ मे रोजीच्या चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार गायब झाले. १४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी येथून उमेदवारी अर्ज भरतानाही अजित पवारांच्या जागी प्रफुल पटेल उपस्थित होते.