सोलापूर : विकास चाटी
राज्यातील मातब्बर पवार घराण्यामध्ये भाऊबंदकीचा आता पुढचा अंक सुरू झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दि. ९ नोव्हेंबर रोजी सोलापुरात आ. रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारासाठी घेतलेली सभा हे अधोरेखित करत आहे.
तीन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मातब्बर नेत्यांमध्ये जे राज्यात सभा घ्यायचे त्यात शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांचे नाव प्राधान्याने घेतले जात होते. मात्र गेल्या काही वर्षात चित्र पुरते बदलले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवरून झालेल्या बेबनावाचे पर्यवसान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यात झाले. पुतणे अजित पवार यांनी काकांना धक्का देत बंडखोरी केली आणि महायुती सरकारला पाठिंबा दिला. उपमुख्यमंत्रीपद तर मिळवलेच पण पक्षाचे नाव आणि अधिकृत चिन्हही पळवले.
काका आपल्याला डावलून बहिण सुप्रिया सुळे यांना पुढे करीत आहेत. रोहित पवारांना पुढे आणून त्यांना माझे राजकारण संपून टाकायचे आहे, असे कारण अजित पवार यांनी पक्ष फोडताना दिले. सुप्रिया सुळेंना पुढे आणण्याचा शरद पवारांचा डाव असेल हा होरा राजकीय तज्ञांनाही खरा वाटला. मात्र अजित पवारांना डावलून रोहित पवारांना पुढे आणण्याचा शरद पवार प्रयत्न करत आहेत याची खात्री वाटत नव्हती. त्यामुळे पक्षाचे बहुतांश आमदार जरी अजित पवार यांच्या मागे गेले तरी काकांना दिलेल्या दगा फटक्याचा राग धरून कार्यकर्ते मात्र शरद पवारांच्या मागे ठामपणे उभे होते.
परिणामी शरद पवार यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा पद्धतीने पक्षाची पुन्हा उभारणी केली. दोघांच्या शक्ती सामर्थ्याचा पहिला निवाडा झाला तो लोकसभेच्या निवडणुकीत. त्यावेळी जनतेच्या मनातील रागाचा फायदा शरद पवार यांना झाला आणि लोकसभेत त्यांच्या पक्षाचे दहापैकी आठ उमेदवार विजयी झाले. अजित पवारांना त्यांच्या पक्षाचा एकच उमेदवार निवडून आणता आला. आपल्या पत्नीलाही हक्काच्या बारामती मतदारसंघातून विजयी करता आले नाही. जनतेने दिलेल्या या एकतर्फी निकालामुळे एकीकडे शरद पवार यांचा आत्मविश्वास वाढला तर अजित पवारांचा पुरता कमी झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
अशा परिस्थितीत विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये रोहित पवार यांच्या समावेश झाला आहे. तेही प्रचार सभांमध्ये आपली भूमिका दमदार भाषण करून जनतेला पटवून देण्यात यशस्वी ठरत असल्याचे सोलापुरात महेश कोठे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत दिसून आले. आता शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यानंतर रोहित पवार यांना पक्षात दुसरे स्थान देण्याचा खटाटोप चालवल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एकंदरीत परिस्थितीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुन्हा स्व-पक्षामध्ये माघारीचे दोर कापले गेल्याचे दिसून येत आहे.
लोकसभेत अजित पवार गटाला मिळालेला मोठा पराभव व सध्या पक्षाला चालू असलेली गळती पाहता आगामी काळात अजित पवार गटाच्या एकजूटीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अजित पवारांचा आत्मविश्वास कमी झाल्याचे दिसत असून त्यांनी जागा वाटपात कमी जागा घेण्याबरोबरच मुख्यमंत्री पदाचा दावाही सोडून दिला आहे. अशातच जर या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे फार कमी आमदार निवडून आल्यास अजित पवार यांचे राजकीय भवितव्य संकटात येणार आहे.