25.3 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeराष्ट्रीयअखिलेश यादव यांनी एक्झिट पोलवर उपस्थित केला प्रश्न

अखिलेश यादव यांनी एक्झिट पोलवर उपस्थित केला प्रश्न

लखनौ : सपा प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एक्झिट पोलचा क्रोनोलॉजी (कालक्रम) समजून घ्या असे त्यांनी सोशल मीडिया एक्सवर म्हटले आहे. भाजपची प्रसारमाध्यमे भाजपला तीनशेहून अधिक जागा दाखवतील, त्यामुळे त्यांना फसवणूक करायला वाव मिळेल, असे विरोधकांनी आधीच म्हटले होते, असे अखिलेश यादव यांनी म्हटले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा भाजपचा एक्झिट पोल हा अनेक महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता मात्र, प्रसारमाध्यमांवर तो आज चालवला जात आहे. या एक्झिट पोलद्वारे जनमताची फसवणूक केली जात आहे. या एक्झिट पोलच्या आधारे, भाजपला सोमवारी शेअर बाजार उघडल्यानंतर तात्काळ नफा मिळवायचा आहे, असा दावाही अखिलेश यांनी केला आहे. चंदिगढच्या महापौरपदाच्या निवडणुकीप्रमाणे संपूर्ण देशाचा निकाल बदलता येणार नाही, हे भाजपवाले समजू लागले आहेत कारण यावेळी विरोधक पूर्णपणे सतर्क असून जनतेचा आक्रोशही शिगेला पोहोचला आहे, असेही ते म्हणाले.

इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आहे ईव्हीएमवर लक्ष
यासोबतच अखिलेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाची सक्रियता पाहून भाजपशी संबंधित भ्रष्ट अधिकारीही फसवणूक करण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत आणि त्यांना जनतेच्या रोषाला बळी पडायचे नाही. इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते, अधिकारी आणि उमेदवार ईव्हीएमवर लक्ष ठेवून आहेत. इंडिया आघाडी जिंकत आहे. त्यामुळे सतर्क राहून मतमोजणी करून विजयाचा दाखला मिळाल्यावरच विजय साजरा करा, असा सल्लाही सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR