बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. सदर घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत, त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (२८ डिसेंबर) बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अशातच या घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण, धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न यासह राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले, अशा घटनांच्या निषेधार्थ राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज येत्या ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान ३ दिवस बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने घेतला आहे.
महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेतर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे आदर्श माजी सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा सरपंचावरील जीवघेण्या हल्याच्या दुस-या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
यावरून सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. राज्यात अशा घटना घडणे हे अतिशय चिंताजनक असून सरपंचांनी गावगाडा चालवायचा कसा? त्यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कुणी? असा सवाल करत अशा घटनावर आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत. सरपंच सुरक्षेसाठी कायदा करावा, हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्या मागच्या मास्टर माईंडचा शोध घेण्यात यावा. सरपंच तथा ग्रामपंचायत पदाधिका-यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, अशी सरपंच संघटनेची मागणी आहे.