मुंबई : प्रतिनिधी
भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या सभेत भाजपाचे नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावर अश्लाघ्य टीका केल्यानंतर संगमनेर तालुक्यातील वातावरण तापले आहे. सोेबतच आता सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावात सुजय विखेंची सभा शुक्रवारी सायंकाळी पार पडली. यावेळी वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल नको ते विधान केले. या विधानानंतर थोरात समर्थकांनी सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यावर हल्ला केला. काही वाहनांची तोडफोड केली.
तसेच सुजय विखेंचे बॅनरही फाडले. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भाजपचा पटका गळ्यात घातलेले नेते पुरोगामी महाराष्ट्रात जाहीरपणे ‘तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही’ अशी धमकी देतायत. हीच भाजपची मनुवादी मानसिकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे नेते महिलांचे रक्षण काय करणार? निवडणूक जिंकणे हा भाजपचा एकमेव अजेंडा आहे. त्यासाठी ते किती खालची पातळी गाठू शकतात हे उघड झाले आहे.
हेच का भाजपाचे संस्कार? : सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध केला. भाजपाचे नेते वसंत देशमुख यांनी जयश्रीताई थोरात यांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ विधान केले. भरसभेत आपल्या मुलीच्या वयाच्या नेत्यावर अशा पद्धतीने गलिच्छ भाषेत टीका करण्यात आली, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विशेष म्हणजे माजी खासदार सुजय विखे देखील या सभेला उपस्थित होते. शिवरायांच्या ज्या राज्यात महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणा-यांना कठोर शिक्षा देण्यात येत होती, त्या राज्यात महिलांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ भाषा वापरण्यात येत आहे. हे भाजपाचे संस्कार आहेत. या विधानाचा तीव्र निषेध. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो ही प्रार्थना.
अजित पवार गटाकडूनही निषेध
अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले की, काल संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्येविषयी ज्या पद्धतीने देशमुख नावाचे वृद्ध गृहस्थ बरळले ते संतापजनक आहे. भाऊ म्हणून आम्ही डॉ. जयश्री थोरात यांच्या पाठीशी खंबीर आहोत. राजकारण इतक्याही खालच्या पातळीवर जाऊ नये.
तीव्र निषेध नोंदवतो! : डॉ. खासदार अमोल कोल्हे
‘माझे मार्गदर्शक, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या, माझी बहीण डॉ. जयश्रीताई यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान करण्यात आले, त्याचा तीव्र निषेध नोंदवतो! राजकारण होत राहील, पण परस्त्रीला मातेसमान मानणारा छत्रपतींचा संस्कार त्यांच्याच महाराष्ट्रात पायदळी तुडवण्याचे काम काल झाले, ही बाब मनाला चीड आणणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जिजाऊंच्या लेकीचे भर सभेत चारित्र्यहनन होणे ही सबंध महाराष्ट्रासाठी दुर्दैवी घटना आहे अशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक्सवर पोस्ट टाकून यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सत्यजीत तांबेंची सुजय विखेंवर टीका
काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी थेट सुजय विखेंवर टीका केली आहे. केवळ मतांवर डोळा ठेवून ‘माझी लाडकी बहीण’ म्हणायचं आणि रणांगणात आव्हान उभं करणा-या लेकीवर भर सभेत अश्लील शेरेबाजी करायची, तिला घराबाहेर पडू न देण्याची भाषा करायची हीच भारतीय जनता पार्टीची खरी वृत्ती आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता या वृत्तीला लवकरच महाराष्ट्रातून हद्दपार करेल.