लातूर : प्रतिनिधी
शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही अजित पवारांशी केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय, असे विधान भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केले आहे. या विधानामुळे महायुतीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने लोकसभेत आपल्याला फटका बसल्याचे मत भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे. त्यात शिवसेनेकडूनदेखील अजित पवार गटाकडे बोट ठेवण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील पक्ष वेगळे लढणार का? की अजित पवार गटाला बाहेरचा रस्ता दाखवणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झाली. आता भाजप आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाशी युती म्हणजे असंगाशी संग, असा टोला गणेश हाकेंनी लगावला आहे. अजित पवार गटाने युती धर्म पाळला का? भाजपच्या खासदाराला पाडल्याचाही आरोप हाकेंनी अजित पवार गटावर केला आहे. यामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. र्दुैवाने आमच्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे. ही युती आम्हाला पटली नाही, असे ते म्हणाले. गणेश हाके हे भाजप प्रदेश प्रवक्ते असल्याने त्यांचे विधान गांभीर्याने घेतले जात आहे.
हाके यांचे हे वैयक्तिक मत : अजित पवार गट
हे गणेश हाके यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांना तिकिट हवे होते. ते न मिळाल्याने हाके उद्विग्न झाले असतील. गणेश हाकेंना विचारून महायुती ठरली नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे. महायुतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या राष्ट्रवादीची नाही. विधानसभेला तिकिट न मिळाल्याने अशी वाचाळवीरासारखी वक्तव्ये करू नयेत, असे आवाहन त्यांनी हाकेंना केले.