बार्शी : उपळे-दुमाला येथील श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, संचलित वखारिया विद्यालयात एस. एस. सी. बॅच १९७०-७१ च्या विद्यार्थ्यांचे स्रेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी तब्बल ५४ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी एकमेकांची गळेभेट घेत माजी विद्यार्थी मित्रांनी एकमेकांची आस्थेने आरोग्य, कुटुबांविषयी चौकशी केली. यावेळी उपस्थित अनेक माजी विद्यार्थ्यांचे जुन्या आठवणींनी डोळे पाणावले होते. सेवानिवृत्त शिक्षक डी. एस. आगलावे यांनी विद्यालयाचा इतिहास उलगडला. यावेळी ३९ माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, सचिव पी. टी. पाटील, खजिनदार बापूसाहेब शितोळे, प्रा. किरण गाढवे, डॉ. सुनील घाटे, माजी पंचायत सदस्य विलास गाटे यांच्या हस्ते कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे, छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांनी केले तर मान्यवरांचे डॉ. सुनील घाटे, तात्यासाहेब शिंदे, अरुण क्षीरसागर यांनी शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गुलाब तांबोळी लिखित- माय व्हिलेज, माय स्टोरी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. यादव यांनी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी लोकवर्गणीतून खेड्या-पाड्यातील गोरगरीबांची मुले शिकावित म्हणून शाळा सुरू केल्यामुळे आज संस्थेचा खूप मोठा विस्तार झाला आहे.
संस्था आजही कर्मवीरांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत असल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव पी. टी. पाटील यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार विद्यालयात पुढील वर्षापासून विज्ञान शाखेचे ११ वी १२ वीचे वर्ग सुरू करणार असल्याचे सांगून जुन्या वर्ग खोल्या पाडून त्या जागी नवीन वर्ग खोल्या बांधणार असल्याचे सांगितले. कवी मनाच्या शितोळे बापूंनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रत्येकाने शाळेच्या प्रगतीसाठी आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर सर्वांनी एकत्र मिळून सहभोजनाचा आस्वाद घेतला. स्रेहसंमेलनासाठी विलास गाटे, तात्यासाहेब शिंदे, अरुण क्षीरसागर रामहरी पुजारी यांनी परिश्रम घेतले. सर्वांनी मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांचे आभार मानून १९७०- ७१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.