अमरावती : भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने राजकारणात अधिकृतरीत्या प्रवेश केला आहे. ३७ वर्षीय रायडू जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षात सामील झाला असून वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत त्याने पक्षात प्रवेश केला. सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असताना रायडूने राजकारणात प्रवेश केला. अशा स्थितीत पक्ष त्याला लोकसभा निवडणुकीत तिकीट देणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रायडूने २९ मे रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता. राजकारणात येण्यापूर्वी त्याने आपल्या मूळ गुंटूर जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्याला भेट दिली आणि समस्या समजून घेण्यासाठी लोकांची भेट घेतली. दरम्यान, त्याने गुंटूर किंवा मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून २०२४ च्या लोकसभा निवडणुका लढवण्याचा विचार करत असल्याच्या अटकळांना फेटाळून लावले आहे.
रायुडूने भारतासाठी ५५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने ४७ पेक्षा जास्त सरासरीने १६९४ धावा केल्या. रायुडूने वनडेमध्ये ३ शतके आणि १० अर्धशतके केली आहेत. त्याने ३ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याच वेळी रायडूने ६ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि १०.५० च्या सरासरीने ४२ धावा केल्या. याशिवाय रायडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६१५१ धावा केल्या आहेत, तर लिस्ट ए मध्ये ५६०७ धावा केल्या आहेत.