28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री मुग्धा गोडबोलेला गंडविण्याचा प्रयत्न

अभिनेत्री मुग्धा गोडबोलेला गंडविण्याचा प्रयत्न

मुंबई : अभिनेत्री मुग्धा गोडबोले रानडेने नुकतेच फेसबुकवर काही स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. हे स्क्रिनशॉट्स शेअर करुन मुग्धाने तिच्यासोबत घडलेल्या फसवणुकीच्या प्रयत्नाचे संपूर्ण प्रकरण सांगितले. अशातच आता मुग्धाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

मुग्धाने पोस्टमध्ये लिहिले ५ फेब्रुवारीला दुपारी घडलेला प्रसंग किंवा खरं तर फ्रॉडचा प्रयत्न. मी दुस-या दिवशीच्या लताबाईंवरच्या कार्यक्रमाच्या तालमीत होते. खूप गडबड, मागे वाद्यांचे आवाज. अशात मला एक फोन आला. एक माणूस हिंदी भाषेत म्हणाला की मी तुमच्या नव-याकडून पैसे घेतले होते. ते म्हणाले आहेत ते पैसे मी तुमच्या अकाऊंटवर परत जमा करावेत. १२,५०० रुपये आहेत. बोलताना तो नव-याच्या नावापुढे सर सर एवढंच म्हणत होता. हे शक्य आहे असं मला वाटले. पुढे त्याने आधी १०००० रुपये ट्रान्सफर केल्याचा मेसेज आला आणि मग २५००० रुपये पाठवल्याचा मेसेज आला. हे सगळे वा-याच्या वेगाने सुरू होते. आणि मग तो म्हणू लागला की, मी चुकून २,५०० च्या ऐवजी २५,००० ट्रान्स्फर केले आहेत तर कृपया ते परत करा. मधल्या काळात मी नव-याशी संपर्क केला.

त्याने सांगितले असे काहीही नाही. एकीकडे ह्या माणसाचे सतत फोन येत होते. आता त्याने पैसे परत करा म्हणून धोशा लावला. शेवटी मी त्याला ओरडले. पैसे मिळणार नाहीत म्हणून. त्याने माझ्या नव-याच्या नंबरवर फोन केला. त्याला तो म्हणाला की मी चुकून शर्मा नावाच्या माणसाच्या ऐवजी रानडे आडनावाच्या माणसाच्या बायकोला पैसे दिले आहेत तर ते मला परत करा. माझ्या नव-याने त्याला आधारकार्ड आणि बँक स्टेटमेंट चा स्क्रीन शॉट मागवला. त्यानंतर पुढच्या मिनिटाला माझ्या कडचे मेसेजेस डिलीट झालेले होते. पण मी स्क्रीन शॉट काढून ठेवला होता तो हा खाली दिलेला. त्या क्षणी हे मेसेज बँकेकडून आलेले नाहीत हे आपल्याला कळत नाही. त्याचा ड्राफ्ट तंतोतंत आहे असेही मुग्धाने पोस्टमध्ये लिहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR