नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने आज देशातील संरक्षित क्षेत्रांतील बिबट्यांच्या प्रगणनेचा अहवाल प्रकाशित केला. त्यात मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक असून महाराष्ट्र दुस-या, तर कर्नाटक तिस-या स्थानावर आहे.
देशातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे १३,८७४ असल्याचे जाहीर केले आहे. बिबट्यांच्या प्रगणनेचा पाचवा अहवाल प्रकाशित झाला. हा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, भारतीय वन्यजीव संस्था यांनी देशातील विविध राज्यांच्या वन विभागांच्या मदतीने तयार केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे १,९८५ असल्याचे सांगण्यात आले आहे.
२०१८ साली ही संख्या १,६९० होती. या संख्येत १२२ बिबट्यांची भर पडली आहे. राज्यातील संरक्षित क्षेत्रांमध्ये आढळणा-या एकूण संख्येपैकी जवळपास ७५ टक्के संख्या ही संरक्षित वनक्षेत्राबाहेर राहत असल्याची महत्त्वपूर्ण नोंद अहवालात नमूद आहे. विदर्भातील पेंच, बोर, नवेगाव नागझिरा, मेळघाट आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बिबट्यांच्या अधिवासाची घनता २०१८ च्या तुलनेत वाढली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबट्या अधिवासाच्या घनतेमध्ये वाढ झाल्याचेही अहवालात नमूद आहे.
राज्यनिहाय बिबट्यांची संख्या ….
मध्य प्रदेश – ३,९०७, महाराष्ट्र – १,९८५, कर्नाटक – १,८७९, तामिळनाडू – १,०७०, छत्तीसगड – ७२२, राजस्थान – ७२१, उत्तराखंड – ६५२, उत्तर प्रदेश – ३७१, तेलंगाणा – २९७, बिहार – ८६, झारखंड – ५१