28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरराज्य सरकारला आचारसंहिता लागेपर्यंतच अल्टिमेटम

राज्य सरकारला आचारसंहिता लागेपर्यंतच अल्टिमेटम

मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा मेळाव्याला विक्रमी गर्दी

नारायणगड : आज बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे झालेल्या दसरा मेळाव्यामधून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्यातील महायुती सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिले असून मागच्या १४ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. पण सरकारने एकही मागणी मान्य केलेली नाही. आता सरकारला सुटी नाही. सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. आता आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची. मात्र सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर, सरकारच्या नाकावर टिच्चून सरकारला उलटपालटे केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच मनोज जरांगेंनी दिला. तसेच आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करेन. तेव्हा मी जे सांगेन ते तुम्ही ऐकायचे असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित मराठा समाजाला केले.

यावेळी उपस्थित मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, या ताकदीने आपण एकत्र येणार असे वाटले नव्हते. दु:खातून सुखाकडे जायचे आहे. या समुदायावर संस्कार आहेत, त्यामुळे हा समुदाय कधीच जातीयवाद करू शकत नाही. संपूर्ण राज्यभर पसरला आहे. पण कधी मस्तीत आणि मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचे प्रत्येकाला साथ देण्याचे काम या समुदायाने केले आहे. यांनी कधी जातीयवाद केला नाही आणि जात यांना कधी शिवली पण नाही. एवढा जनसमुदाय पहिल्यांदाच बघतोय. काय बोलावे ते सूचत नाही आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय आलाय की की, तुमच्या चरणावर खरंच नतमस्तक व्हायला पाहिजे. जातीवाद न करण्याची शिकवण या नारायणगडाने राज्याला देशाला दिलीय. या गडाच्या आशीर्वाद ज्याच्या पाठीवर पडतो तो दिल्लीसुद्धा वाकवतो, असे जरांगे म्हणाले. जरांगे पुढे म्हणाले की, आरक्षणाच्या मागणीसाठी मागच्या १४ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारने एकही मागणी मान्य केली नाही. माझे सरकारला एकचं सांगणं आहे. सरकार, ओय सरकार, आता तुम्हाला सुटी नाही. आचारसंहिता लागण्याआधी जनतेचे सर्व प्रश्न सोडवायचे. मात्र तसं झालं नाही तर आचारसंहिता लागल्यानंतर मी सांगेन ते तुम्ही ऐकायचं. हे काय करताहेत हे सगळं बघायचं. त्यांच सगळं करून झाल्याशिवाय आपण निर्णय घ्यायचा नाही. नंतर सगळं गणित उलटं करून टाकायचे.

तर सरकारला संपविणार
एक गोष्ट लक्षात असू द्या, शेवटी आपल्यापुढे पर्याय नाहीये. मी माझी मुख्य भूमिका आचारसंहिता लागल्यानंतर सांगणार आहे. तुम्हा सगळ्यांना मान्य आहे ना. यांनी आपल्याला फसवले आहे. त्यामुळे आता आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची. जनतेच्या मागण्यांची अंमलबजावणी आचारसंहिता लागेपर्यंत करतात का हे पाहायचे. मात्र असं झालं नाही तर यांच्या नाकावर टिच्चून यांना उलथं केल्याशिवाय मागे हटणार, असा इशाराच जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. तसेच ‘’तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करणा-या सरकारला संपवल्याशिवाय मागे हटणार नाही’’, असं आश्वासनही त्यांनी मराठा समाजाला दिलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR