23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरआनंद चंदनशिवे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश मुंबईत होणार : उमेश पाटील

आनंद चंदनशिवे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश मुंबईत होणार : उमेश पाटील

सोलापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच सोलापूर दौरा केला. या दरम्यान माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या निवासस्थानी पवार जाणार होते. मात्र वेळेअभावी ते याठिकाणी जाऊ शकले नाहीत.

त्यामुळे चंदनशिवे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश मुंबईत पवार यांच्या उपस्थितीत होईल. माजी महापौर महेश कोठे हे हे अधिकृतरीत्या त्या राष्ट्रवादीत नाहीत. त्यांनी बिज्जू प्रधाने यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना पुढे पाठविले आहे. त्यामुळे ते आता कोठेही जाणार नाहीत, असे सांगून महेश कोठेही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतच येतील असे अप्रत्यक्ष सुतोवाच राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले.

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूरच्या दौऱ्यात पवार यांनी सोलापूरच्या विकासकामांसाठी सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचेही यावेळी पाटील यांनी सांगितले. सोलापुरात अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या कानपिचक्या या योग्यच आहेत.

सर्वच पक्षात काही प्रमाणात गटबाजी असते. ही गटबाजी दूर करण्याचा प्रयत्न होत आहे. वरिष्ठांनी दिलेला तो सल्ला होता. पदाधिकाऱ्यांतील विसंवादामुळे काही प्रमाणात गैरसमज व दुरावा निर्माण झाला होता, असेही उमेश पाटील यांनी यावेळी सांगितले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अकरा जागा मिळण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघात सध्या मित्रपक्षाचा उमेदवार आहे. तरीही निवडून येण्याच्या निकषावर ऐनवेळी बरिष्ठ पातळीवर निर्णय झाला तर होईल.

सोलापूर शहर हद्दवाढ भागाचा आतापर्यंत विकास खुंटला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता महापालिकेत आली तर हद्दवाढ भागातील सर्व प्रश्न सोडविण्यात येतील. हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द असेल असेही पाटील यांनी सांगितले.

खा. शरद पवार यांच्या सोलापूर शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या वयाच्या कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. मात्र जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यापेक्षा भारत जाधव लहान आहेत. वयाचा हा निकष काका साठे यांच्याबाबतीत का लागू झाला नाही असाही प्रश्न यावेळी उमेश पाटील यांनी उपस्थित करून काका साठे यांच्यावर निशाणा साधला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR