मुंबई : विशेष प्रतिनिधी
‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या अनिल देशमुख यांच्या पुस्तकाचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीचे कव्हर पेज समोर आले आहे. या पुस्तकातील काही पाने हाती लागली आहेत. त्यातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुखांची ही डायरी विधानसभा निवडणुकीला राजकीय फोडणी देणार अशी चिन्हे दिसत आहेत.
अनिल देशमुख यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकात त्यांचे राजकीय करिअर आणि विशेषत: महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे गृहमंत्री असतानाचे अनुभव त्यांनी लिहिले आहेत. या पुस्तकात अनिल देशमुख यांनी एका अधिका-याच्या हवाल्याने केंद्रीय यंत्रणा ईडीविरुद्ध गंभीर आरोप लावले आहेत. ‘ईडी – वरून प्रेशर आहे’ या प्रकरणात अनिल देशमुख यांनी ईडीच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. २०२१ च्या दिवाळीच्या दिवशी ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांची अटक कशी झाली, याचा उल्लेख केला आहे.
१ नोव्हेंबर २०२१ ला अनिल देशमुख यांनी ईडीच्या चौकशीला हजेरी लावली. ऐन दिवाळीच्या तोंडावर अनिल देशमुख यांच्या झालेल्या चौकशीचा या पुस्तकात उल्लेख आहे. मी स्वत:हून ईडीच्या कार्यालयात गेलो. त्यावेळी मी असं चौकशीसाठी येणं अपेक्षित नव्हतं. त्यांच्याकडे दिवाळीचा माहौल होता. पण मी चौकशीला गेल्याने त्यावर विरजण पडलं. तुम्ही चौकशीसाठी आजचाच दिवस का निवडला? आमची सगळ्यांची दिवाळी खराब करून टाकली, असं त्या अधिका-याने म्हटलं. दिवाळी तर माझीही खराब होणार होती. पण मी न्यायासाठी आनंदावर पाणी सोडायला तयार होतो, असा प्रसंग अनिल देशमुख यांच्या पुस्तकात लिहिण्यात आला आहे.
अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना राज्यात विविध घडामोडी घडल्या. त्यांच्या गृहमंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही महत्त्वाच्या घटनांचा उलगडा या पुस्तकातून होऊ शकतो. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवणं. मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझे आणि परमबीर स्ािंग यांच्याशी संबंधित बाबींचा या पुस्तकातून उलगडा होऊ शकतो. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात येणा-या अनिल देशमुख यांच्या या पुस्तकामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.