27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेसमध्ये विभागनिहाय निरीक्षकांची घोषणा

काँग्रेसमध्ये विभागनिहाय निरीक्षकांची घोषणा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती आखण्यात आली आहे. तसेच निवडणुकीच्या रणनीतीमध्ये समन्वय राखण्यासाठी विभागनिहाय निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना नियुक्त केले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाचलं आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यामधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, काँग्रेसने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागनिहाय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये मुंबई आणि कोकण विभागाची जबाबदारी ही अशोक गहलोत आणि जी. परमेश्वरा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर विदर्भ विभागाची जबाबदारी भूपेश बघेल, चरणजीत सिंग चन्नी आणि उमंग सिंघर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी टी. एस. सिंहदेव आणि एम. बी. पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी ही सईद नासीर हुसेन आणि डी. अनसुया सीताक्का यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने ४४ जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात १३ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता महाराष्ट्रात विधानसभेच्या अधिकाधिक जागा जिंकण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू आहे.

मराठवाड्याची जबाबदारी पायलट, रेड्डींकडे
मराठवाड्यात योग्य समन्वय साधण्यासाठी मराठवाड्याची जबाबदारी काँग्रेस नेते सचिन पायलट आणि उत्तम कुमार रेड्डी यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR