मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्र किना-यवर हिट अँड रनची घटना समोर आली आहे. एका भरधाव एसयूव्ही कारने वर्सोवा समुद्र किना-यावर झोपलेल्या दोघांना चिरडले.
या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा अपघातात गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर कार चालक फरार झाला होता. मात्र, सीसीटीव्हीच्या मदतीने वर्सोवा पोलिसांनी कार चालकासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. गणेश यादव (वय ३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, आरोपी कार चालक निखली जावडे आणि त्याचा मित्र शुभम डोंगरेला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश यादव हा ऑटोरिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो, तर त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव हा डिलीव्हरी बॉयचं काम करतो. ते अधुनमधून वर्सोवा समुद्र किना-यावर झोपत असत. सोमवारी देखील ते वर्सोवा समुद्र किना-यावर झोपले होते. तेव्हा रात्री झोपेत असताना एक भरधाव कार आली आणि त्यांना चिरडून गेली. घटनेनंतर बबलू श्रीवास्तव जागा झाला असता, त्याला शरिरावर जखमा दिसल्या.गणेश यादव हा देखील त्याच्या बाजूला घोपला होता. त्याच्या अंगावरून कार गेली. बबलुने तातडीने गणेशला रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.