मुंबई : १ जानेवारी २०२५ रोजी पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षल प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पालकमंत्री व्हायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली दौ-याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले आहे. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुकास पात्र आहेत असे कौतुक सामनाच्या अग्रलेखातून केले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सामनाचे आभार मानले आहेत.
नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोली पोलाद सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असलील तर त्याचे स्वागत करायला हवे. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीचा विकासाचा विडा आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठी उटलला आहे, कोणा खाणसम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंनी घ्यावी लागेल. तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, हा त्यांचा वादा खरा होईल. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत, असेही सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.
आज आनंदाचा दिवस : बावनकुळे
आता सामनाच्या अग्रलेखावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. बावनकुळे यांनी सामनाचे आभार मानले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमच्याकडे आज आनंदाचा दिवस आहे. अनेक दिवसापासून आम्ही सामनातून चांगले लिहिन्याची वाट बघत होतो. यापूर्वीच त्यांना चांगले लिहिता आले असते. आज देवेंद्रजींना महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता गडचिरोली असतील. नक्षलवाद संपवण्याचे असेल. किमान सामनातून देवेंद्र फडणीस यांचे कौतुक होणे हे आमच्यासाठी विकसित महाराष्ट्र घेऊन जात आहे याकरता आनंदाची गोष्ट आहे असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. तेव्हाही सामना कौतुक करेल याची प्रतिक्षा होती, पण ठिक आहे उशीरा केले यासाठी धन्यावाद, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.