27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयनव्या कुस्ती महासंघाची मान्यता केंद्र सरकारकडून रद्द

नव्या कुस्ती महासंघाची मान्यता केंद्र सरकारकडून रद्द

बृजभूषण सिंह यांना मोठा धक्का!

नवी दिल्ली : नव्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरकारकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष आणि बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना देखील पदावरून हटविण्यात आले आहे.

कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे नाराज झालेल्या कुस्तीगीर साक्षी मलिक हिने खेळातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. तर कुस्तीगीर आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने आपले पद्म पुरस्कार परत केले होते. वाद वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. नव्याने नियुक्त कुस्ती महासंघाची मान्यताच रद्द करण्यात आली आहे.

जवळपास वर्षभराने कुस्ती महासंघाची निवडणूक झाली होती. त्यात बृजभूषण सिंह यांचा दबदबा पाहायला मिळाला. महत्त्वाच्या पदावर त्यांच्याच माणसांची नियुक्ती झाली होती. बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगीरांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यांच्यावर कारवाईची मागणी करत क्रीडापटूंकडून काही महिन्यांपूर्वी मोठे आंदोलन उभारण्यात आले होते.

सरकारकडून कारवाईचे आश्वासन देण्यात आल्यानंतर कुस्तीगीरांनी आंदोलन मागे घेतले होते. पण, निवडणुकीत पुन्हा बृजभूषण यांनाच संधी मिळाल्याने काही कुस्तीगीर नाराज झाले होते. यातूनच दोन कुस्तीगीरांकडून टोकाचे पाऊल उचलण्यात आले होते. त्यांना इतर खेळाडूंकडून पाठिंबा वाढत चालला होता. याची दखल केंद्र सरकारने अखेर घेतली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेपूर्वीच दणका
भारतीय कुस्ती महासंघाने कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली आहे. ही टूर्नामेंट २८ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे होणार आहे. यामुळे भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक नाराज होती. त्यांनी कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला.

साक्षी मलिक-विनेश फोगटचा कुस्तीला रामराम
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह निवडून आले. त्यांच्या पॅनलला ४० मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रीय खेळातील पदक विजेती अनिता श्योराण यांना केवळ ७ मते पडली होती. संजय सिंह यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्याने साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी कुस्तीला रामराम ठोकला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR