परभणी : शहरातील अद्वैता स्कूल ऑफ एक्सीलेंसमध्ये इयत्ता ७वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या आराधना संजय ताटे या विद्यार्थिनीने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्र संघातून राष्ट्रीय संघासाठी तिची निवड झाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक मिळवले आहे.
स्कूल गेमस फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने ६७व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन पुणे येथे १० ते १३ जानेवारी दरम्यान करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयामार्फत ही स्पर्धा घेण्यात आली. महाराष्ट्र संघाने स्क्वॅश मुली वयोगट १४ या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून संघामध्ये परभणीची खेळाडू आराधना हिचा देखील समावेश होता.
या यशाबद्दल आराधना यांचे पुणे क्रीडा विभागाचे उपसंचालक अनिल चोरमले, महाराष्ट्र स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांडरे, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावंडे, परभणीचे जिल्हा क्रीडा अधिकारी टेंबरे, परभणी जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे सचिव कैलास माने, मार्गदर्शक महेशकुमार काळदाते, स्क्वॅश असोसिएशनचे अन्य विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक व ताटे कुटुंबियांनी अभिनंदन केले आहे.