जालना : जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी एका कार्यक्रमात केले. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. भाजपा नेते प्रसाद लाड म्हणाले, मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना आरक्षणाबाबत विचारणार आहे का? महाविकास आघाडीचा बुरखा फाडणार आहात का? की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा बुरखा घालून राहुल गांधींची साथ देणार आहात, अशी टीका केली.
दरम्यान, आता या टीकेली मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर देत आम्ही राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का? ते आमचे काम नाही, कुणाला काय कराचे, हे त्यांचे राजकीय स्टेटमेंट आहेत. त्याला आम्ही नाही बोलणार, आम्ही फक्त आरक्षणावर बोलणार. बाकीच्या गोष्टी आम्हाला सांगायच्या नाहीत. प्रसाद लाड यांच्यासारखी लोक देवेंद्र फडणवीस यांना वाचविणारी लोक आहेत. जात वाचविणारी लोक नाहीत, असा टोलाही मनोज जरांगे पाटील यांनी लगावला.
भाजपा आमदार राजेंद्र राऊत यांनी आज बार्शीत आंदोलन केले. या आंदोलनावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ते आंदोलन करुदेत, काय होत आहे. ते चांगले काम करीत आहेत. एकदाच विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे. त्याशिवाय कोणता आमदार मराठ्यांच्या बाजूने बोलतो हे कळणार नाही. विरोधी पक्षाचे आमदार काय म्हणत आहेत. सत्ताधारी आमदार काय म्हणतात हे तर कळेल, असंही जरांगे पाटील म्हणाले. यावेळी पत्रकारांनी जरांगे पाटील यांनी तुमचीही विशेष अधिवेशनाची मागणी आहे का? असा सवाल केला. यावेळी पाटील म्हणाले, ती व्यक्तीही फडणवीस यांच्या सैन्यातील आहे. त्यामुळे ते काहीही मागणी करु शकतात. सत्ता टीकवण्यासाठी आणि पद टीकवण्यासाठी ते काहीही करु शकतात. शेवटी फडणवीस सांगतात तसेच त्यांना करावे लागणार आहे, असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला.
या लोकांचा दोष नाही, हे सगळे फडणवीस घडवून आणत आहेत. फडणवीस यांना कळत नाही की आपण किती संपवत आहे. जेवढी आमदार, मंत्री बोलतील तितका समाज त्यांच्यावर चिडेल. त्यांच्या पक्षातील मराठा समाजातही आता खदखद निर्माण झाली आहे. आपण मंत्र्यांना मोठे केले तेच आमदार आता समाजाविरोधात बोलत आहेत, असे त्यांना वाटेल असेही पाटील म्हणाले. हे नेते स्वत:च पक्ष आणि संपत्ती वाचवण्यासाठी समाजाच्या विरोधात गेले आहेत.
आमच्यासाठी कोणताही नेता मोठा नाही, आमच्यासाठी आरक्षण मोठं आहे. मराठ्यांना यांच्या तोंडून हे ऐकायचे होते. आरक्षणामुळे आमच्या समाजाचा फायदा होणार आहे, या नेत्यांना आता फडणवीस यांनी कामे दिली आहेत. यांना आता झोपू देणार नाहीत, संपत्ती वाचवण्यासाठी काहीही करतील. फडणवीस सत्तेचा गैरवापर करुन काम करत आहेत. आमचे ऐक नाहीतर तुला तुरुंगात टाकण्याची भीती घालतात, मलाही एसआयटी स्थापन करुन अशीच भीती घातलेली, असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला.
आरक्षण द्यावे लागणार
तुम्हाला आता आरक्षण द्यावेच लागणार आहे. त्याशिवाय मराठा मागे हटत नाही. आमचेच लोक आमच्याविरोधात घालून देवेंद्र फडणवीस फसत आहेत. तुम्ही आरक्षण द्या, तुम्ही आरक्षण न देता खड्डा भरुन काढू शकत नाही, तुम्हाला आरक्षण द्यावेच लागणार आहे असेही पाटील म्हणाले.