सोलापूर – जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची २०१८-१९ पासूनची थकीत वेतन देयके शिक्षकांना मिळणार असून यामध्ये शिक्षण सेवक, सहशिक्षक काळातील फरक बिल, मुख्याध्यापक मान्यता फरक बिल, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा तिसरा व चौथा हप्ता, महागाई भत्ता फरक, मयत कर्मचारी देयके, वैद्यकीय बिले तसेच इतर थकीत वेतन देयके यांचा समावेश आहे.
यासाठी शासनाकडून सुमारे ७५ कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झाल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन अधीक्षक दीपक मुंढे यांनी दिली असून सदर रक्कम लवकरच सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांच्या खात्यावर जमा होईल. गेल्या वर्षी थकीत वेतन न मिळालेल्या शिक्षकांचे वेतन मिळावे, यासाठी प्रहार शिक्षक संघटनेने पाठपुरावा केला होता. त्यानुसार मागील वर्षी राहिलेल्या याद्या तयार करून त्या संचालक कार्यालयात पाठवून त्या मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.
दरम्यान, सर्व याद्या मंजूर झाल्याबद्दल प्रहार शिक्षक संघटनेतर्फे वेतन अधीक्षक दीपक मुंढे, लिपिक अरविंद ताटे, सागर अंबुरे, कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक, शहराध्यक्ष राजेश काडादी, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश कल्याणी, सांगोला तालुकाध्यक्ष रमेश पवार, दक्षिणचे सचिव गिरीश कडते, वीरभद्र स्वामी, भगवान कदम, आवटी आदी उपस्थित होते.