बंगळूरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना उच्च न्यायालयाने सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी मोठा दिलासा दिला असून जमिनीशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सिद्धारामैय्या यांच्यावर सध्यातरी अटकेची कारवाई होणार नसल्याचे आदेश जारी केले आहेत.
जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सिद्धारामैय्या यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, तोपर्यंत या प्रकरणाला स्थगित ठेवावे असे कर्नाटक उच्च न्यायालयाने एमपी-एमएलए कोर्टाला दिलेल्या आदेशात म्हटले आहे. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी सिद्धारामैय्या यांनी केलेल्या अपिलावर सुनावणी करताना हा अंतरिम आदेश दिला आहे. कर्नाटकच्या राज्यपालांनी सिद्धारामैय्या यांच्याविरोधात खटला चालविण्यास दिलेल्या परवानगीविरोधात सिद्धारामैय्या यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही २९ ऑगस्ट रोजी होणार आहे.
हायकोर्टाने हे आदेश देताना सांगितले की, या या प्रकरणाची सुनावणी ही या कोर्टामध्ये सुरू आहे. तसेच युक्तिवादही अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत संबंधित कोर्टाने आपली कारवाई स्थगित ठेवावी. तसेच या प्रकरणी तोपर्यंत कुठलीही कारवाई होणार नाही. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी तीन लोकांनी केलेल्या तक्रारींवरून सिद्धारामैय्या यांच्याविरोधात तपासाला मान्यता दिली होती.