23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeपरभणी३५ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणा-या आरोपींना अटक करा : प्रा. डॉ. प्रविण कनकुटे

३५ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणा-या आरोपींना अटक करा : प्रा. डॉ. प्रविण कनकुटे

परभणी : देशामध्ये सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसमोर अगोदरच खूप मोठ्या समस्या आणि बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असताना नीट आणि नेट परीक्षा यांचे पेपर जाणून बुजून काही आरोपींनी फोडणे म्हणजे या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे होय. दोन्ही मिळून ३५ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे ३५ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळाणा-या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी भिमशक्ती संघटनेचे मराठवाडा नेते प्रा. डॉ. प्रविण कनकुटे यांनी केली आहे.

युजी नीट परीक्षा २०२४ या वर्षी २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तसेच यूजीसी नेट ही परीक्षा ११ लाख विद्यार्थ्यांनी दिली. नीट आणि नेट या दोन्ही परीक्षा मिळून ३५ लाख विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य उज्वल करण्यासाठी ही परीक्षा दिली होती. परंतु पेपर फुटीच्या कारणामुळे या परीक्षा मोठ्या प्रमाणात गाजल्या. युजी नीट या परीक्षेचे पेपर फोडण्यामागे महाराष्ट्रातील या परीक्षेचे क्लासेस घेणारे ज्या संस्था आहेत त्यांची देखील यामध्ये सखोल चौकशी करण्यात यावी. यूजीसी नेट परीक्षा ही प्राध्यापक होण्यासाठी पात्रता परीक्षा असून देशातील ११ लाख विद्यार्थ्यांनी यासाठी फॉर्म भरले होते. त्यासाठी करोडो रुपयाची फीस जमा झाली होती. ही परीक्षा रद्द झाल्यामुळे होणारी परीक्षा आणि त्यासाठी लागणारे कोणतेही शुल्क यूजीसीने आकारू नये अशी मागणी प्रा. कनकुटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

या पुढील परीक्षा ही पारदर्शकपणे आणि कुठलाही गोंधळ न होता पार पाडावी. तसेच युजी नीट आणि यूजीसी नेट या दोन्ही परीक्षांचे पेपर लीक करणा-या मुख्य आरोपींना तात्काळ अटक करावी आणि ३५ लाख विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी भिमशक्ती संघटनेचे मराठवाडा नेते प्रा.डॉ. प्रवीण कनकुटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR