22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रअटकेत असलेल्या वकिलांना कोर्टात अश्रू अनावर

अटकेत असलेल्या वकिलांना कोर्टात अश्रू अनावर

शरद मोहोळ हत्या प्रकरण

पुणे:  कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा शुक्रवारी (५ जानेवारी) भरदिवसा गोळ्या झाडून खून करण्यात आला. मोहोळच्या खून प्रकरणी पोलिसांनी २ वकिलांसह ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या सगळ्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर अटक केलेल्या वकिलांना कोर्टातच अश्रू अनावर झाले.

शरद मोहोळ याचा खून केल्यानंतर आरोपींनी फोनद्वारे संपर्क करत आम्हाला शरण यायचे आहे असे सांगितले. आम्ही आरोपींना शरण येण्याचा सल्ला दिला. पोलिसांनाही तशा प्रकारचा संपर्क केला होता. दरम्यानच्या काळात त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे एक पथक आले. त्या पथकाला आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, त्यांनी काहीही ऐकले नाही, असे शरद मोहोळ खून प्रकरणात अटक असलेल्या एका वकिलाने न्यायालयासमोर सांगितले.

आम्ही गेल्या १५ वर्षांपासून वकिली करत आहोत, असे सांगतानाच वकिलाला न्यायालयातच रडू कोसळले. मात्र, तुम्ही काही केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही, असे न्यायाधीशांनी सांगितले.

प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांच्या न्यायालयाने वकिलांना ८ जानेवारीपर्यंत तर अन्य सहा आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेले दोघेही वकील हे बार असोसिएशनचे सदस्य आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित ऊर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, वकील रवींद्र पवार, वकील संजय उढाण त्यांना काल न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

मामाचा अपमान.. भाच्याने बदला घेतला
शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकरचा मामा नामदेव कानगुडे आणि शरद मोहोळ यांच्यात दहा वर्षांपूर्वी वाद झाला होता. त्यावेळी नामदेव कानगुडे हा सुतारदरा परिसरातच राहत होता. नामदेव कानगुडे याला शरद मोहोळ याने मारहाण केली होती. याचा राग साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकरच्या डोक्यात होता. शरद मोहोळ याच्याशी वाद झाल्यानंतर नामदेव कानगुडे याला सुतारदरा परिसर सोडावा लागला. त्यानंतर तो भुगावला स्थायिक झाला. तेव्हापासूनचा राग डोक्यात असलेल्या मुन्नाने शांतपणे व्यवस्थित प्लॅन करून शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR