सोलापूर / प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष संपत असताना समायोजनाचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल उपस्थित करत २०१८ प्रमाणे अतिरिक्त शिक्षकांना बदलीयादीत संधी देण्यात यावी, आधार वैध यावर पटनोंदणी हे पहिलेच वर्ष असल्याने यामध्ये अनावधानाने राहिल्याने शिक्षकांना अतिरिक्त न करता जर त्या शाळेत पट असेल तर सवलत देण्यात यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनेने शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे केली आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासोबत चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी यावेळी दिले.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांसारखी पदे गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे अगोदर पदोन्नती करा अशी मागणी शिक्षक संघटनाच्या पदाधिका-यांनी लावून धरली. शैक्षणिक वर्ष संपत आले असून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तुर्तास समायोजन थांबविण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. याप्रसंगी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे म.ज.मोरे, अनिरुध्द पवार, राजन सावंत, संजीव चाफाकरंडे, सुरेश पवार, आशिष चव्हाण, डॉ. रंगनाथ काकडे, सूर्यकांत हत्तुरे, शरद रुपनवर, बब्रुवान काशीद, बसवराज गुरव, हनुमंत सरडे, चंद्रहास चोरमले, दीपक वडवेराव, प्रशांत वर्धमाने, सुनील अडगळे, नितीन बाभळे, अंबादास वाघमारे उपस्थित होते.