बारामती : विशेष प्रतिनिधी
भाजपसोबत गेलेले अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे येऊ शकतात, अशीही एक चर्चा होत आहे. याच मुद्द्याला धरून अजित पवारांना पुन्हा सोबत घेणार का, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना एका वृत्तसंस्थेने मुलाखतीत विचारला. त्यावेळी त्यांनी वरील स्पष्ट संकेत दिले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘जोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपसोबत आहेत, तोपर्यंत त्यांना राजकीयदृष्ट्या पुन्हा सोबत घेणे अशक्य आहे’. राजकीय अंगाने सांगायचं, तर हे सांगणे खूप अवघड आहे. कारण अजित पवार भाजपसोबत काम करत आहेत. त्यांना सोबत घेणे इतके सोपे नाहीये. आमच्या विचारधारा पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जयंत पाटलांनीही दिला नकार : एका मुलाखतीत बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अजित पवारांना सोबत घेणार नसल्याचे सांगितले. अजित पवार आमच्यापासून फार लांब गेले आहेत. लांब गेल्याचं सगळ्या देशाला दिसतंय. ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली, आता ते बरेच लांब गेले आहेत. ते परत येण्याची शक्यता नाही आणि ते परत आमच्याकडे येणार, हा प्रश्न आमच्याकडे उद्भवत नाही. आमच्याकडे सगळ्या जागा आता भरल्या गेल्या आहेत, असे उत्तर जयंत पाटील यांनी दिलं होतं.