पुणे : पुणे पोलिसांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई मागील दोन दिवसांत झाली आहे. पुणे पोलिसांनी दोन दिवसांत तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे दोन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.
पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांत ही कारवाई केली. पुण्यातील ड्रग्जची व्याप्ती आणखी मोठी असल्याचे अनेकांचे मत आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी वैभव ऊर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडून साडेतीन कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले. तेथूनच पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली. पोलिसांनी आपली सर्व सूत्रे हलवत पुण्यात ठिकठिकाणी धाडी मारल्या. पिंट्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्रांतवाडीतील भैरवनगरमधील गोदामातून ५५ किलो ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर दौंडमधील कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थकेम कारखान्यावर छापा मारला. जिथे ड्रग्जची निर्मिती होत होती. येथे पोलिसांनी ६०० किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले. त्याशिवाय या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सहभागी असल्याचेही तपासात समोर आले.
मिठाच्या पाकिटात लपवला ड्रग्जचा साठा
वैभन माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आले आहेत. तेव्हापासून या दोघांनी ड्रग्जची विक्री करण्यास सुरुवात केली. पुण्यात मोठ्या प्रमाणात ते ड्रग्ज विक्री करायचे. ड्रग्ज साठा पोलिसांच्या हाती लागेल म्हणून हैदरने शक्कल लढवली आणि हैदरने ड्रग्जसाठा मिठाच्या पाकिटात पुण्यातील विश्रांतवाडी भागात लपवला होता.