क-हाड : जिल्ह्यातून दोन वर्षांत तब्बल ४३६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील तब्बल ३७० मुलींना शोधले आहे. पोलिसांच्या अॅण्टी ुमन ट्रॅफिकिंग पथकास त्यात यश आले आहे. मात्र, त्यात ६० टक्के अल्पवयीन मुली प्रेमप्रकरणातून लग्नाच्या आमिषापोटी पळून गेल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे.
दोन वर्षांत तब्बल ८९ लहान मुले बेपत्ता होती. त्यातील ८२ मुले शोधण्यात या पथकाला यश आले आहे. घरगुती कारणामुळे ती मुले बेपत्ता झाल्याचे त्यांनी कबूल केल्याने त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी अल्पवयीन मुलींसह लहान बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. त्या अत्याचारावर प्रतिबंधासाठी अॅण्टी ुमन ट्रॅफिकिंग सेल अग्रेसर आहे. जिल्ह्यात एक तर राज्यात ५० पथके स्थापन झाली आहेत. त्यात रेल्वे पोलिसांचाही समावेश आहे.
जानेवारी ते नोव्हेंबरअखेर २२६ मुली बेपत्ता झाल्या. त्यातील १६० मुली सापडल्या आहेत. अद्यापही ६६ मुली बेपत्ता आहेत. २०२२ मध्ये २३१ मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील २१० मुली सापडल्या. अद्यापही २१ मुली बेपत्ता आहेत. तर यावर्षी ४३ मुले बेपत्ता झाली होती. त्यातील ४० मुले सापडली आहेत. मागील वर्षी ४६ मुले बेपत्ता होती. त्यातील ४२ मुले सापडली आहेत.
अशी झाली रचना
राज्यासह जिल्ह्यात अल्पवयीन मुलींसह बालकांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण गंभीर होते. ती स्थिती लक्षात घेऊन त्यावर ठोस पावले उचलण्यासाठी शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात मुलींसह बालकांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अॅण्टी ुमन ट्रॅफिकिंग पथकाची स्थापना झाली. सातारा जिल्ह्यात सहाजणांचे स्वतंत्र पथक आहे. २०१४ मध्ये सातारा व सांगली जिल्ह्यात केवळ एकच पथक होते. २०२० मध्ये पुन्हा राज्यात २४ पथके स्थापन झाली. त्यात साता-याला स्वतंत्र पथक झाले.