16.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रबांगलादेशी घुसखोरांनी काढले तब्बल ६०० बनावट पासपोर्ट

बांगलादेशी घुसखोरांनी काढले तब्बल ६०० बनावट पासपोर्ट

पुणे : परदेशी नागरिकांना भारतीय पासपोर्ट मिळवून देणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. सीबीआयसह अन्य राज्यांच्या तपास यंत्रणा याबाबत कारवाई करत आहेत. काही दिवसापूर्वीच सीबीआयने ५० ठिकाणी बनावट पासपोर्ट प्रकरणी छापा टाकला होता. दरम्यान, पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेशी घुसखोरांनी पुण्यात तब्बल ६०० बनावट पासपोर्ट काढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तसेच या प्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे.

पुणे शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०४ पासपोर्ट काढल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरी प्रकरणी हडपसर, वानवडी, भारती विद्यापीठ, फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी २९ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती.

कारवाईनंतर पोलिसांनी बांगलादेशींची चौकशी केली. तेव्हा बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी ६०४ पासपोर्ट काढल्याचे उघडकीस आले. बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र काढल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने आणि पुणे पोलिसांच्या पारपत्र पडताळणी विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी पारपत्र पडताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहे.

व्यक्तिगत चौकशीचे आदेश
पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांची व्यक्तिगत चौकशी करावी. तसेच अर्जदार नागरिकांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करावी. परिसरातील नागरिकांकडे वास्तव्याबाबत चौकशी करण्यात यावी, असे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.

पडताळणी काटेकोरपणाने करावी
पोलीस आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, आधारकार्ड, जन्म दाखला, तसेच अन्य आवश्यक कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणाने करावी. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR