नागपूर : प्रतिनिधी
विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने महायुतीच्या वतीने विविध सरकारी योजनांचे चौकार, षटकार ठोकले जात आहेत. अशातच आता लाडक्या बहिणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा सेविका, आरोग्य सेविकांना मोबाईलसोबतच रिचार्जसाठी पैसे दिले जाणार असल्याची घोषणा नागपूर येथे केली.
दरम्यान, राज्य शासनाच्या वतीने महिला, युवक आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्या एकाच वेळी सुरू होणार नाहीत. मात्र, आम्ही वेगाने निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. ज्या योजना जाहीर केल्या त्याची झटपट अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत येणा-या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, आमदार परिणय फुके, आशिष जयस्वाल, प्रवीण दटके, समीर मेघे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते आशासेविकांना मोबाईलचे वाटप करण्यात आले.
मोबाईल दिला मात्र रिचार्ज कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे लक्षात घेत फडणवीसांनी भाषणाच्या सुरुवातीला सर्वांची शंका दूर केली. मोबाईल रिचार्जसाठी खनिज विकास निधीतून वार्षिक निधी दिला जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.