मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि भाजपचे जेष्ठ नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यामध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज ठाकरेचे मुंबईसह महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. याचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. भाजपला महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच जागा जिंकायच्या आहेत. यासाठी भाजप मनसेला सोबत घेऊ शकतो. मुंबईत लोकसभेच्या ६ जागा आहेत. या सहाही जागा भाजपला जिंकायच्या आहेत. मुंबईतील मराठी मते भाजपला राज ठाकरेंच्या साथीने आपल्याकडे खेचायचे आहेत असे राजकीय तज्ज्ञांच मत आहे.
दरम्यान मागील अनेक दिवसापासून मनसे आणि भाजप सोबत येतील अशी चर्चा सुरू आहे. तर काही दिवसांपूर्वीच मनसेचे बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले होते. मुंबईत उध्दव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजप राज ठाकरेंना सोबत घेऊ शकते. कारण उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यापासून आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फुट पाडल्यापासून मुंबईसह महाराष्ट्रातून उध्दव ठाकरेंना मतदारांकडून सहानुभूती मिळत असल्याचे अनेक सर्वेक्षणामधून दिसून आले आहे.