इंफाळ : हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये कर्तव्यावर असलेल्या आसाम रायफल्सच्या जवानाने त्याच्या साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला तर अन्य पाच जवान जखमी झाले आहेत. यानंतर गोळीबार करणाऱ्या जवानाने स्वत:लाही गोळी मारली. जखमी जवानांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी रात्री उशिरा मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यातील साजिक टम्पक भागात ही घटना घडली. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.
मात्र, आसाम रायफल्सने अद्याप दोन जवानांच्या मृत्यूला दुजोरा दिलेला नाही. तर मणिपूर पोलिसांनी या दुर्दैवी घटनेचा सध्या सुरू असलेल्या जातीय संघर्षाशी संबंध जोडू नये, असे म्हटले आहे. वृत्तानुसार, मंगळवारच्या मध्यरात्री मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यातील साजिक ताम्पक येथील रानाटॉप पोस्टवर तैनात १५ आसाम रायफल्सचे जवान हवालदार संगपी बाइट यांनी अनेक वेळा गोळीबार केला. त्यांच्या सहकाऱ्यांवर गोळ्या झाडण्यापूर्वी शिबिराच्या ठिकाणी त्यांच्यात जोरदार वाद झाला.
वाद सुरू असताना त्याने अचानक त्याच्या साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये आसाम रायफल्सचे पाच जवान गोळ्या लागल्याने जखमी झाले. यात दोन जवानांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र, याला आसाम रायफल्सकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंतर त्याने स्वतःवर गोळी झाडली.