न्यूयॉर्क : लोकप्रीय अब्जाधीश आणि मीडिया मुगल म्हणून ओळखले जाणारे रुपर्ट मरडॉक पुन्हा एकदा विवाह बंधनात अडणार आहेत. रुपर्ट मरडॉक रशियातील मॉस्कोत राहणा-या ६७ वर्षीय एलेना झुकोवा यांच्याशी लग्न करणार आहेत.
मरडॉक ९२ वर्षांचे असून त्यांचे हे पाचवे लग्न असणार आहे. त्यांचा लग्नसोहळा हा कॅलिफोर्निया येथे होणार आहे. मरडॉक यांनी फॉक्स आणि न्यूज कॉर्पच्या चेअरमनपदाचा नुकताच राजीनामा दिला आहे.
रुपर्ट मरडॉक यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, एलेना झुकोवा यांच्यासोबत त्यांचा साखरपुडा पार पडला आहे आणि सध्या लग्नाची तयारी सुरू आहे. एलेना झुकोवा मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट पदावरून रिटायर झाल्या आहेत. तसेच या दोघांची ओळख मागील वर्षी उन्हाळ्यात झाली होती. विशेष म्हणजे या दोघांची ओळख मरडॉक यांची तिसरी पत्नी वेंडी डेंग यांनी करून दिली होती.
माध्यम सम्राट रुपर्ट मरडॉक यांनी यापूर्वी चार लग्न केली आहेत. त्यांचे चौथे लग्न मॉडेल आणि अभिनेत्री जेरी हॉल यांच्यासोबत झाले होते. हे लग्न सहा वर्ष टिकले आणि २०२२ मध्ये मरडॉक आणि हॉल यांचा घटस्फोट झाला. मागील वर्षी मरडॉक यांचे नाव अॅन लेस्ली स्मिथ यांच्यासोबत देखील जोडले गेले होते. हॉल यांच्या आधी मरडॉक यांचे लग्न ऑस्ट्रेलियाची फ्लाइट अटेंडेंट पॅट्रेशिया बुकर, स्कॉटलंडच्या पत्रकार अॅना मान आणि वेंडी डेंग यांच्यासोबत झाले होते.