जलालाबाद : अफगाणिस्तानमधील जलालाबाद येथे भारतीय वाणिज्य दूतावासाच्या वाहनावर भीषण हल्ला झाला असून या हल्ल्यात तेथील स्थानिक कर्मचारी असलेल्या वादूद खान यांच्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर वादूद खान यांच्यासह २ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधील जलालाबाद येथे बंद पडलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासाशी संबंधित अफगाण कर्मचा-यांवर मंगळवारी अज्ञात बंदुकधा-यांनी हल्ला केला. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारने परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे. तसेच या हल्ल्यात कुठल्याही भारतीय कर्मचा-याचा मृत्यू झालेला नाही. तसेच कुणीही जखमी झालेले नाही.
अफगाणिस्तानमधील जलालाबादमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास अधिकृतपणे २०२० पासून बंद आहे. मात्र अफगाणिस्तानमधील स्थानिक लोकांचा छोटासा कर्मचारी वर्ग तिथे कार्यरत आहे. स्थानिक माध्यमामधील बातम्या आणि सोशल मीडिया पोस्टवरील माहितीनुसार या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. मंगळवारी घडलेला हा हल्ला एक टार्गेटेड हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कुठल्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.