29 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeराष्ट्रीयकृष्णजन्मभूमीतील मंदिर औरंगजेबाने पाडले

कृष्णजन्मभूमीतील मंदिर औरंगजेबाने पाडले

मथुरेवर एएसआयचा मोठा खुलासा

मथुरा : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय)ने मथुरेच्या कृष्णजन्मभूमी मंदिर संकुलाबद्दल १९२० च्या राजपत्रातील ऐतिहासिक नोंदींवर आधारित माहिती उघड केली आहे. आरटीआय प्रश्नाला उत्तर देताना एएसआयने ही माहिती दिली. मथुरा येथील कृष्णाच्या जन्मस्थानाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

माहितीच्या अधिकाराच्या उत्तरात, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने म्हटले आहे की, मुघल शासक औरंगजेबाने मशिदीसाठी मार्ग तयार करण्यासाठी संकुलातील एक हिंदू मंदिर पाडले होते. मात्र, आरटीआयच्या उत्तरात ‘कृष्णजन्मभूमी’चा विशेष उल्लेख नसून केशवदेव मंदिराचा उल्लेख आहे. दरम्यान शाही ईदगाह हटवण्यासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आरटीआयचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरू शकतो, असे बोलले जात आहे.

उत्तर प्रदेश येथील मैनपुरी येथील अजय प्रताप सिंह यांनी आरटीआय दाखल करत देशातील मंदिर विध्वंसाबाबत माहिती मागवली होती. यामध्ये मथुरा येथील श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाबाबतही माहिती मागविण्यात आली होती. याला प्रत्युत्तर म्हणून भारताच्या पुरातत्व विभागाने ब्रिटिश राजवटीत १९२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या राजपत्राच्या आधारे दावा केला की पूर्वी मशिदीच्या जागी कटरा केशवदेव मंदिर होते. ते पाडून मशीद बांधण्यात आली.

मशिदीच्या विरोधात याचिकाकर्त्यांपैकी एक वकील महेंद्र प्रताप सिंह म्हणाले, अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयासमोर महत्त्वाचे पुरावे सादर करतील. ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे आम्ही आमच्या याचिकेत म्हटले आहे की, औरंगजेबाने मथुरेतील केशवदेव मंदिर १६७० मध्ये पाडण्याचा आदेश जारी केला होता.

यानंतर तेथे शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली. आता एएसआयने आरटीआयच्या उत्तरात माहिती दिली आहे. २२ फेब्रुवारीला होणा-या पुढील सुनावणीदरम्यान आम्ही एएसआयचे उत्तर उच्च न्यायालयात सादर करू. यामुळे शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाच्या आमच्या मागणीला बळ मिळेल, असे ते म्हणाले.

गेल्या आठवड्यातच सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाने शाही ईदगाह मशिदीच्या न्यायालयाच्या देखरेखीखाली दिलेल्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली होती. ही बंदी एप्रिलच्या मध्यापर्यंत लागू राहणार आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR