22.8 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरअविनाश पाठक बीडचे नवे जिल्हाधिकारी

अविनाश पाठक बीडचे नवे जिल्हाधिकारी

बीड : येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी बुधवारी काढला असून नवीन पदाचा पदभार तत्काळ स्वीकारण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडून ते गुरुवारी पदभार स्वीकारतील. परंतु मुधोळ यांना कोणत्या ठिकाणी नियुक्ती दिली आहे याबाबत कोणताही आदेश सांयकाळपर्यंत पारीत झाला नव्हता. तर दुस-या बाजूला पाठक यांच्या जागेवर कोण येणार? याकडेही लक्ष लागले आहे.

१४ फेब्रुवारी २०२३ रोजी दीपा मुधोळ यांनी बीड जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतला. या आगोदर त्या धाराशिव येथे होत्या. पदभार स्वीकारल्यानंतर मुधोळ यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार घेऊन आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित अधिका-यांना तत्काळ फोन लावून तक्रार निकाली काढण्याची सूचना त्या देत होत्या. त्यामुळे त्यांच्या दालनाबाहेर नेहमीच गर्दी असायची. लोकसभा निवडणूक काळात त्यांच्याविरुद्ध तक्रारी झाल्या. आचारसंहिता संपताच त्यांची बदली करण्यात आली. मागील पाच ते सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी मुधोळ यांच्या बदलीची चर्चा होती.

जिल्हाधिकारीपदी पाठक यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता जिल्हाधिकारी मुधोळ यांची पुणे येथे बदली केली जाईल अशी शक्यता आहे. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत मुधोळ यांच्या नव्या नियुक्तीबाबत आदेश निघाला नव्हता. दरम्यान, अविनाश पाठक यांनी बीडमध्ये उपजिल्हाधिकारी या पदावर काम केलेले आहे. मागील वर्षी जिल्हा परिषद सीईओंचा पदभार त्यांनी स्वीकारला होता. त्यानंतर याच जिल्ह्यात त्यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR