अंबाजोगाई : प्रतिनिधी
येथील प्रसिध्द लेखक उमेश मोहिते यांच्या ‘खोडा’ या कथासंग्रहाला मुक्त सृजन संस्था, छत्रपती संभाजीनगर यांचा चक्रधर स्वामी ‘मुक्त सृजन उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला असून इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये आनंद पेंढारकर (डोंबिवली), सविता करंजकर (धाराशिव), स्मिता दातार (मुंबई), डॉ. सतोष जाधव (छ. संभाजीनगर), प्रमोद नारायणे (वर्धा) आणि डॉ. सहदेव रसाळ (धाराशिव) यांचा समावेश आहे. या सर्व वाड्मय पुरस्कारांचे स्वरूप मानपत्र, शाल, स्मृतिचिन्ह आणि रोख रु. २५०० असून या पुरस्कारांचे वितरण छत्रपती संभाजीनगर येथे पुढील महिन्यात मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेश खरात यांनी दिली.
उमेश मोहिते यांच्या गतवर्षी प्रकाशित झालेल्या ‘खोडा’ या ग्रामीण कष्टकरी शेतक-याचे जीवन चित्रित करणा-या कथासंग्रहाला यापूर्वी कृष्णाई-कुंडल प्रतिष्ठान, सातारा आणि शिवांजली साहित्यपीठ, चाळकवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे यांचे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार मिळाले असून हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.
उमेश मोहिते यांची आतापर्यंत बालकथा, कथा आणि कादंबरी अशी मिळून एकूण दहा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांचा ‘वळख’ हा कथासंग्रह सध्या विद्यापीठाच्या एम.ए.मराठीच्या अभ्यासक्रमातही समाविष्ट आहे. तसेच उमेश मोहिते यांनी फेब्रुवारी २०१५ ला मसाप शाखा, माजलगाव यांनी आयोजित केलेल्या सातव्या ‘शिवार’ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले असून त्यांचा ‘पॅडीची गोष्ट’हा बालकथासंग्रहही लवकरच प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांच्या यशाबद्दल उमेश मोहिते यांचे मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.